सातारा / प्रतिनिधी :
शिक्षिकेला शरीर सुखाची मागणी करणारे गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ यांचा विषय सातारा पंचायत समितीच्या उद्या होणाऱ्या मासिक सभेत गाजणार आहे. सत्ताधारी या प्रकरणामध्ये अनभिज्ञ कसे? असे म्हणून विरोधक कोंडी करणार आहेत. दरम्यान, शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांना सातारा तालुका पोलिसांनी बोलवणे केले होते. तसेच त्या शिक्षिकेवर गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या बाजूने दबाव टाकणारे काही महाभागही अडचणीत येणार आहेत. त्यांचीही चौकशी होवून त्यांच्यावर कारवाई होणार आहे. रिपाइंचे गवई गटाकडून बुधवारी याच विषयावर आंदोलन होणार आहे.
गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ याच्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल होवूनही तो गप्प बसला नाही. तर त्यातून आपल्याला सातारा जिल्ह्यातच कसे राहता येईल, यासाठी खटपटी सुरु झाल्या आहेत. दरम्यान, त्या शिक्षिकेवर ज्यांनी ज्यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या सांगण्यावरुन दबाव आणला त्यांचीही चौकशी होणार आहे. त्यांच्यावरही खातेअंतर्गत व कायदेशीर कारवाईचा ससेमीरा लागणार आहे. पोलीस ठाण्यात दाखल गुह्याच्या अनुषंगाने शिक्षणाधिकाऱ्यांना तालुका पोलिसांनी बोलवणे केले होते. परंतु त्या गेल्या नव्हत्या. ज्यांच्यावर जबाबदारी सोपवली तेही अन्य ठिकाणी गेले असल्याचे समजते. त्यामुळे शिक्षण विभागाची चालढकल तसेच सातारा पंचायत समितीच्या मंगळवारी होणाऱ्या मासिक सभेत चांगलाच वादंग होणार आहे.
खासदार उदयनराजे गटाचे सदस्य सत्ताधारी आमदार शिवेंद्रराजे गटाची चांगलीच कोंडी करणार आहेत. दरम्यान, गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ यांच्यासह शिक्षण विभागाच्या कारभाराच्या निषेधार्थ रिपाइंचा गवई गट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी आंदोलन करणार आहे. तसे त्यांनी निवेदन दिले आहे.