वार्ताहर/ कराड
कराड शहरातील प्रसिद्ध गुळाचे अडत व्यापारी, तसेच ट्रेकर व सायकलस्वार सुहास शामराव पाटील (वय 52) यांना ट्रेकिंगदरम्यान हृदयविकाराचा धक्का बसल्याने त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. रविवारी सकाळी घारेवाडी (ता. कराड) येथील धुळोबा डोंगरात ट्रेकींग करीत असताना ही दुदैवी घटना घडली. यावेळी त्यांच्या सोबत असलेल्या सहकाऱयांनी त्यांना तत्काळ रुग्णालयात नेले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे कराड शहर व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
सुहास पाटील हे मार्केट यार्डातील गुळाचे अडत व्यापारी म्हणून प्रसिद्ध होते. उत्तम ट्रेकर व सायकलस्वार म्हणूनही ते प्रसिद्ध होते. त्यांनी वैष्णवदेवी ते श्रीखंड कैलास सायकलने प्रवास केला आहे. नवरात्रीत त्यांनी सायकलने कोल्हापूरला जाऊन अंबाबाईचे दर्शन घेतले आहे. परिसरातील अनेक गड व डोंगरात त्यांनी ट्रेकींग केले होते. कराड ते वैष्णवदेवी व पुन्हा कराड अशी परिक्रमा यात्रा चालत पूर्ण केली आहे. कराड ते रायगड, कराड ते कोल्हापूर सायकल ट्रेक पूर्ण केले होते.
रविवारी सकाळी धुळोबा डोंगरावर ट्रेकींगसाठी जाताना सुहास पाटील आणि त्यांच्या सहकाऱयांनी घारेवाडीतील मंदिराजवळ वाहने लावली. त्यानंतर धुळोबाचा डेंगर सर करत असताना सुहास पाटील यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला. या धक्क्याने ते खाली कोसळले. ही घटना लक्षात येताच त्यांच्यासोबत असलेल्या अन्य ट्रेकर्सनी शहरातून अन्य ट्रेकर्सना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर कसलाही विलंब न लावता तब्बल 40 हून अधिक ट्रेकर्सनी धुळोबाच्या डोंगराकडे धाव घेतली. सुहास पाटील यांना सर्व ट्रेकर्सनी शिडीच्या सहाय्याने डोंगर पायथ्याची आणले. तसेच तत्काळ रुग्णवाहिकेतून उपचारासाठी कृष्णा रुग्णालयात आणले मात्र रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यापूर्वीच सुहास पाटील यांचा मृत्यू झाला होता.