जपानच्या कंपनीकडून अनोखा नियम
धूम्रपान करणे आरोग्यासाठी हानिकारक आहे, तरीही अनेक लोक या इशाऱयाकडे दुर्लक्ष करतात. घरी, रस्त्यांवर, कार्यालयांमध्ये लोक धूम्रपान करताना दिसून येतात. कार्यालयांमध्ये धूम्रपान करणारे लोक अनेकदा ब्रेक घेत धूम्रपान करताना दिसून येतात. अशा स्थितीत जे लोक धूम्रपान करत नाहीत, ते इतके ब्रेक घेत नाहीत. जपानच्या एका कंपनीने धूम्रपान न करणाऱया कर्मचाऱयांच्या भल्याचा विचार केला आहे.
मार्केटिंक कंपनी पियाला इंकने स्वतःच्या पेड टाइम ऑफ पॉलिसीमध्ये मोठा बदल केला आहे. एका कर्मचाऱयाने धूम्रपान करण्यासाठी वारंवार ब्रेक घेणाऱया कर्मचाऱयांमुळे उत्पादकता कमी होत असल्याची तक्रार केली होती. कंपनीला ही तक्रार योग्य वाटल्याने धूम्रपान न करणाऱया कर्मचाऱयांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला.
कंपनीने धूम्रपान न करणाऱया कर्मचाऱयांना वर्षात 6 अतिरिक्त रजा देण्याची घोषणा केली आहे. धूम्रपान करणारे कर्मचारी एका दिवसात वारंवार ब्रेक घेत असतात. परंतु हे व्यसन नसलेला कर्मचारी तितकावेळ बाहेर पडू शकत नाही असा यामागचा तर्क आहे.
सीईओने सांगितले कारण
काही वर्षांपूर्वी कंपनीच्या सूचनापेटीत एका अज्ञात कर्मचाऱयाने पत्र टाकून सिगारेट ब्रेकमुळे अनेक समस्या निर्माण होत असल्याचे म्हटले होते. सिगारेट बेकमुळे एक कर्मचारी दरदिनी 15 मिनिटांपर्यंत कार्यालयाबाहेर राहतो. असेही त्याने नमूद केले होते. ही बाब समजल्यावर कंपनीचे सीईओ तकाओ आसुका यांनी नॉन स्मोकर्सची भरपाई करण्यासाठी त्यांना स्वतंत्र सुटी देण्याची घोषणा केली. धूम्रपान करणाऱयांना ते सोडण्यासाठी प्रेरित करू इच्छितो. नुकसानीची भीती दाखविण्याऐवजी लाभ दाखविल्यास लोक लवकर धूम्रपान सोडतील असे आसुका यांनी म्हटले आहे.