संगरूरचा खासदार ‘आप’चा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा
आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार भगवंत मान संगरूर जिल्हय़ातील धूरी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढविणार आहेत. आपकडून याची गुरुवारी घोषणा करण्यात आली आहे. भगवंत मान हे सध्या संगरूरचे खासदार आहेत. धूरी हा मतदारसंघ त्यांच्या लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. या मतदारसंघात काँग्रेसकडून दलबीर गोल्डी तर अकाली दल-बसप आघाडीकडून प्रकाश चंद गर्ग उमेदवार आहेत. भाजप तसेच कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या आघाडीने अद्याप येथील उमेदवाराची घोषणा केलेली नाही.
आम आदमी पक्षाने भगवंत मान हे पंजाब निवडणुकीत पक्षाच्या वतीने मुख्यमंत्रिपदाचे दावेदार असतील असे जाहीर केले आहे. पक्षाकडून याकरता मोबाइल क्रमांक प्रसारित करत लोकांचे मत जाणून घेण्याचा उपक्रम राबविण्यात आला होता. सुमारे 22 लाख लोकांनी या क्रमांकावर फोन करून स्वतःचे मत व्यक्त केल्याचा दावा आप संयोजक अरविंद केजरीवाल यांनी केला होता. यातील 93 टक्के लोकांनी भगवंत मान यांना पसंती दर्शविल्याचे केजरीवालांनी म्हटले होते.
यापूर्वीच्या निवडणुकीत पराभूत
भगवंत मान दुसऱयांदा पंजाब विधानसभा निवडणूक लढविणार आहेत. यशस्वी पंजाबी कॉमेडियन राहिलेले भगवंत मान यांनी 2011 मध्ये राजकारणात पाऊल ठेवले होते. मनप्रीत बादल यांच्या पंजाब पीपल्स पक्षात त्यांनी प्रवेश केला होता. 2012 मध्ये त्यांनी लेहरागागा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढविली होती, परंतु त्यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर 2014 मध्ये ते आम आदमी पक्षात सामील झाले. सलग दोन लोकसभा निवडणुकांमध्ये ते विजयी झाले आहेत. 2017 मध्ये त्यांनी जलालाबाद मतदारसंघात अकाली दलाचे प्रमुख सुखबीर बादल यांच्या विरोधात निवडणूक लढविली होती, परंतु त्यांना पराभव पत्करावा लागला होता.