क्रीडा प्रतिनिधी / मडगाव
गोव्याचा अग्रगण्य फुटबॉल क्लब धेंपो स्पोर्ट्स क्लबच्या नवीन फुटबॉल जर्सीचे अनावरण काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते झाले. यावेळी धेंपो उद्योग समुहाचे चेअरमन श्रीनिवास धेंपो, पोलिस महानिरीक्षक जसपाल सिंग (आयपीएस), आरोग्यमंत्री विश्वजित राणे आणि राज्याचे मुख्य सचिव परिमल राय यांची उपस्थिती होती.
धेपो क्लबची नवीन फुटबॉल जर्सी कोविड वॉरियर्सना समर्पित करण्यात आली आहे. धेंपो क्लब हा राज्यातील सर्वांत जुना फुटबॉल क्लब असून राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर त्यांनी चांगली कामगिरी करून गोव्याचे नाव रोशन केले आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर धेंपो क्लबने कित्येक फुटबॉलपटू तयार केले असून त्यांची फुटबॉल अकादमीही आहे. खेळाबरोबरच सामाजिक तसेच चांगल्या कार्यासाठी धेंपो उद्योग समुहाने नेहमीच आपले सहकार्य दिले आहे.