- भोपाळमधील 65 वर्षीय महिलेमध्ये व्हेरियंटची पुष्टी
ऑनलाईन टीम / भोपाळ :
मध्य प्रदेशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात घट होताना दिसत असली तरी, धोका अजूनही कमी झालेला नाही. त्यातच राज्यात कोरोना डेल्टा प्लसचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. भोपाळमधील एका 65 वर्षीय महिलेला कोरोना डेल्टा प्लसची लक्षणे दिसून आली आहेत. या महिलेच्या संपर्कात आलेल्या अन्य 20 जणांची तपासणी केली जात आहे. सध्या ही महिला घरीच आहे.
भोपाळ मधील बरखेडा पठाणी येथील रहिवासी महीलेमध्ये हा प्रकार आढळून आला आहे. काही दिवसांपूर्वी या महिलेचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. या महिलेचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून ही महिला आपल्या घरीच विलगीकरणात आहे. देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी व्हेरियंटला जबाबदार मानले जात आहे. आता याच व्हेरियंटचे दुसरे रूप म्हणजे कोरोना डेल्टा प्लस असे आहे. हा पहिल्यांदा भारतातच आढळून आला होता. आतापर्यंत देशात 6 डेल्टा प्लस प्रकार आढळून आले आहेत. शास्त्रज्ञांच्या मते, या नवीन डेल्टा प्लस प्रकारावर मोनोक्लोनल अँटीबॉडी कॉकटेलचाही परिणाम होताना दिसत नाही आहे.
- महिलेच्या संपर्कात आलेल्या 20 जणांची तपासणी सुरु
भोपाळमधून जूनमध्ये 15 नमुने तपासणीसाठी गांधी मेडिकल कॉलेजमध्ये पाठविण्यात आले आहेत. यामध्ये एका महीलेत डेल्टा प्लसचा प्रकार आढळून आला आहे. या महिलेच्या रिपोर्टमध्ये डेल्टा आणि अन्य प्रकार आढलून आले आहेत. त्यानंतर आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाकडून या महिलेच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची माहिती मिळवत आहेत. आतापर्यंत 20 जणांची माहिती मिळाली असून त्यांची तपासणी केली जात आहे.