अलीकडेच बॉलीवूड अभिनेता संजय दत्त याला फुफ्फुसाच्या कर्करोगाची लागण झाल्याची बातमी आली. त्याचा कर्करोग तिसर्या टप्प्यात पोहोचला आहे. ही कर्करोगाची प्रगत पायरी आहे, त्यामुळे धोका अधिक असल्याचे सांगितले जाते आहे. संजय दत्त आता उपचारांसाठी परदेशी म्हणजे अमेरिकेत गेला आहे. यानिमित्ताने फुफ्फुसाचा कर्करोग म्हणजे काय जाणून घेऊया.
फुफ्फुसांचा कर्करोग कसा होतो किंवा का होतो हे जाणून घेण्यासाठी महत्त्वाचे आहे ते कर्करोग म्हणजे काय ते जाणून घेणे.
आपल्या शरीरात ज्या पेशी किंवा कोशिका असतात त्यांचे एक वैशिष्टय़ असते. या पेशी एका विशिष्ट वयानंतर स्वतःच नष्ट होतात. परंतु कर्करोग झाल्यानंतर शरीराच्या हे वैशिष्टय़ नष्ट पावते.
ठराविक कालावधीनंतरही त्या पेशी मरत नाहीत तर त्या गुणाकाराने वाढत जातात.
शरीराच्या ज्या अवयवांच्या पेशींमध्ये ही समस्या निर्माण होते त्याच अवयवाला कर्करोगाच्या उत्पत्तीची जागा मानले जाते.
कारणे काय?
फुफ्फुसाचा कर्करोग होण्याची काही कारणे आहेत. यातील प्रमुख कारण तंबाखूचे सेवन आणि धूम्रपान करणे आहे. सिगारेट ओढल्याने आणि तंबाखू सेवनाचा थेट संबंध हा फुप्फुसांशी असतो. त्यामुळे फुफ्फुसांचा कर्करोग होण्याचा धोका असतोच.
दुसरे म्हणजे हवेतील प्रदुषण. सध्याचे वातावरण खूप प्रदुषित झाले आहे. कारखान्यांचा धूर असो किंवा डिझेलच्या गाडय़ांतून निघणारा धूर असो, त्या सर्वांतून बेन्झिन वायू बाहेर पडतो. हा वायू फुफ्फुसांच्या कर्करोगाचा धोका निर्माण करण्यास कारणीभूत ठरतो.ङतिसरे कारण म्हणजे अनुवांशिक. शरीरातील जनुकांमधील
बदलांमुळेही अशा प्रकारचा कर्करोग होऊ शकतो.
दोन प्रकार
1) स्मॉल सेल कर्करोग
2) नॉन स्मॉल सेल कर्करोग
लक्षणे कोणती?
तीन आठवडय़ांपासून बरा न होणारा खोकला, कफ पडल्यास त्यात रक्त असणे, जिने चढउतार करताना दम लागणे, छातीत वेदना होणे, सतत वजन कमी होणे.
जर फुफ्फुसाचा कर्करोग दुसर्या अवयवांपर्यंत- उदाहरणार्थ मेंदूपर्यंत – पसरला असेल तर शरीराच्या कोणत्याही भागाला लकवा होऊ शकतो.
कर्करोग मूत्रपिंडापर्यंत पसरला असेल तर काविळ होण्याची शक्यता असते.