ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 93 पोलिसांना कोरोनाची लागण झाली तर तीन जणांनी आपला जीव गमावला आहे. तर आतापर्यंत 12 हजार 383 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर आतापर्यंत 126 पोलिसांनी आपला जीव गमावला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचे नागरिकांकडून काटेकोरपणे पालन व्हावे, यासाठी राज्यभरात ठिकठिकाणी पोलीस तैनात आहेत. मात्र, कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाचा धोका वाढत आहे. त्यामुळे पोलिसांमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत आढळलेल्या 12,383 कोरोनाबाधित पोलिसांमध्ये 1287 पोलीस अधिकारी आणि 11,096 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर आतापर्यंत 9 हजार 929 पोलीस कर्मचाऱ्यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये 987 पोलीस अधिकारी आणि 8942 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
सद्यस्थितीत राज्यात 2328 कोरोनाबाधित पोलीस कर्मचाऱ्यांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यामध्ये 289 पोलीस अधिकारी आणि 2039 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे 126 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 11 पोलीस ऑफिसर आणि 115 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.