वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
बीसीसीआयच्या मध्यवर्ती करारातून वगळण्यात आलेला माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने झारखंड रणजी संघासमवेत गुरुवारी सरावाला सुरुवात केली आहे.
38 वर्षीय धोनी झारखंड रणजी संघासमवेत रांचीमध्ये सराव करताना दिसून आला. यावरून तो आयपीएलच्या तयारीला लागल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे गुरुवारीच बीसीसीआयने त्याला मध्यवर्ती करारबद्ध केलेल्या खेळाडूंच्या यादीतून वगळले आहे. ‘तो आमच्यात सामील होऊन आमच्यासमवेत सराव करेल, याची अजिबात कल्पना नव्हती. पण त्याची उपस्थिती आमच्यासाठी सरप्राईज ठरले. त्याने काही वेळ फलंदाजी केली आणि नंतर नेहमीचा सराव केला,’ झारखंड संघव्यवस्थापनाच्या जवळच्या सूत्राने सांगितले.
धोनीने ट्रेनिंगसाठी नवी कोरी बॉलिंग मशिन विकत आणली आहे. झारखंडचे खेळाडू पारंपरिक लाल चेंडूवर सराव करीत आहेत तर धोनी पांढऱया चेंडूवर सराव करीत आहे. झारखंडचा पुढील रणजी सामना उत्तराखंडविरुद्ध रांचीमध्येच शनिवारपासून सुरू होणार आहे. या संघाला नागोठणेत झालेल्या आपल्या शेवटच्या सामन्यात महाराष्ट्रकडून 8 गडय़ांनी पराभव स्वीकारावा लागला होता. आतापर्यंतच्या 5 सामन्यांत झारखंडने 2 जिंकले, 2 गमविले आणि एक सामना अनिर्णीत ठेवला आहे.
गेल्या वर्षीच्या वनडे विश्वचषक स्पर्धेत भारताला न्यूझीलंडकडून उपांत्य फेरीत पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर धोनीने स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये भाग घेतलेला नाही. त्यानंतर प्रथमच तो सराव करताना दिसत आहे. वनडेमधून तो निवृत्त होणार असल्याचे प्रशिक्षक रवि शास्त्री यांनी अलीकडेच सूचित केले होते. पण मात्र टी-20 विश्वचषकासाठी त्याचा विचार होऊ शकतो, असेही त्यांनी म्हटले होते. आयपीलमधील कामगिरीवर त्याचा टी-20 विश्वचषकातील समावेश अवलंबून असेल. टी-20 विश्वचषक स्पर्धा ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार आहे.