जो-जो खेळाडू धोनीच्या नेतृत्वाखाली खेळतो, तो त्याच्या नेतृत्वगुणाचा चाहता होतो आणि या यादीत आता सॅम करण देखील समाविष्ट झाला आहे. धोनीने सॅम करणला मुंबई इंडियन्सविरुद्ध सलामीच्या लढतीत फलंदाजीत बढती दिली आणि या निर्णयामुळे सॅम करण भलताच सुखावला. धोनी खऱया अर्थाने जिनियस का आहे, याची प्रचिती मला या लढतीत आली, असे सॅम करण म्हणाला.
वास्तविक, चेन्नई सुपरकिंग्स संघाने शनिवारी आयपीएल स्पर्धेतील सलामीच्या लढतीत नाटय़मय विजय संपादन केला, त्यावेळी अवघे क्रिकेट जगत आश्चर्यचकित झाले आणि ते साहजिकही होते. कारण, जवळपास सर्वच आघाडय़ांवर चेन्नईपेक्षा मुंबईचा संघ कागदावर तरी सरस दिसून येत होता. याच पार्श्वभूमीवर चेन्नई संघातील खेळाडू सॅम करणने धोनी जिनियस का मानला जातो, त्याचे उत्तम उदाहरण दिले.
चेन्नईने मुंबईविरुद्ध या लढतीत पाच गडी राखून सहज विजय मिळवला, त्यात सॅम करणने देखील खारीचा वाटा उचलला होता. सॅमने उत्तम गोलंदाजी तर साकारलीच. शिवाय, फलंदाजीत बढती मिळाल्यानंतर अवघ्या 6 चेंडूत 18 धावांची आतषबाजी करत कर्णधार धोनीचा विश्वासही सार्थ ठरवला. रविंद्र जडेजाच्या रुपाने चेन्नईचा चौथा फलंदाज बाद झाला, त्यावेळी संघाला विजयासाठी 17 चेंडूत 29 धावांची आवश्यकता होती. धोनीने यावेळी करणला बढती दिली आणि त्याने धडाकेबाज फलंदाजी करत अक्षरशः विजय खेचून आणला.
सॅम धोनीच्या त्या निर्णयावर आश्चर्यचकित झाला. तो याबद्दल बोलताना म्हणाला, ‘धोनी स्वतः फलंदाजीला येणार होता, त्या जागी त्याने मला फलंदाजीला पाठवले. आमच्या संघाने 18 व्या षटकात फटकेबाजी करण्याचे लक्ष्य नंतर ठरवले होते. त्यानुसार, मी आक्रमण केले. षटकार खेचायचा किंवा बाद व्हायचे, असे दोनच पर्याय होते. सुदैवाने मला फटकेबाजी करण्यात यश मिळाले’.