आयपीएलमधील ‘महागडय़ा’ स्टार खेळाडूंचा लेखाजोखा
सिडनी / वृत्तसंस्था
यंदाच्या आयपीएल स्पर्धेत जागतिक स्तरावरील अव्वल फलंदाजांचा लेखाजोखा उपलब्ध झाला असून यानुसार, चेन्नई सुपरकिंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीची एक धाव त्याच्या प्रँचायझीसाठी साडेसात लाख रुपयांना पडली असल्याचे स्पष्ट झाले आहे. धोनीसाठी चेन्नई प्रँचायझीने 15 कोटी रुपये मोजले होते. त्याने या हंगामात 14 सामने खेळले व त्यात 200 धावा केल्या. यानुसार, त्याची एक धाव 7.5 लाख रुपयांना पडली आहे.
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आपल्या संघाला जेतेपद मिळवून देण्यात यशस्वी झाला असला तरी त्याची एक धाव 5.68 लाख रुपयांना पडली आहे. रोहितसाठी मुंबईने 17 कोटी रुपये मोजले आहेत. त्याने या हंगामात 15 सामने खेळत त्यात 264 धावांचे योगदान दिले.
महागडय़ा स्टार खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचे हंगामातील अपयश आरसीबी प्रँचायझीसाठी विशेष चिंतेचे ठरले. विराटने आरसीबीतर्फे 15 सामन्यात 466 धावा केल्या. त्याच्यासाठी आरसीबीने 17 कोटी रुपये मोजले आहेत. यानुसार, विराटच्या एका धावेसाठी आरसीबीला 3.64 लाख रुपये मोजावे लागले आहेत.
दिल्ली कॅपिटल्सचा युवा फलंदाज ऋषभ पंतची एक धाव 5.23 लाख रुपयांची असल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट झाले. ऋषभ पंतला दिल्ली कॅपिटल्सने 15 कोटी रुपयांना करारबद्ध केले असून त्याने 16 सामन्यात 287 धावा केल्या.
राजस्थान रॉयल्सच्या स्टीव्ह स्मिथला अपवाद वगळता फारसा सूर सापडला नाही. त्याने 14 सामन्यात 344 धावांचे योगदान दिले. त्याच्या एका धावेची किंमत 3.63 लाख झाल्याचे अधोरेखित झाले. राजस्थानने त्याला साडेबारा कोटी रुपयांना संघात कायम राखले होते.
सनरायजर्स हैदराबादचा भक्कम आधारस्तंभ, डावखुरा फलंदाज डेव्हिड वॉर्नरने 16 सामन्यात 548 धावांची आतषबाजी केली असून त्याची एक धाव सनरायजर्स हैदराबादसाठी 2.28 लाख रुपयांना पडली आहे. हैदराबादने त्याला 12.50 कोटी रुपयांना संघात कायम ठेवले होते.