स्वातंत्र्यदिनाच्या सायंकाळी अवघ्या क्रिकेट वर्तुळाला माहीचा अनपेक्षित धक्का, वर्षभराची अनिश्चितता संपुष्टात,
दिल्ली / वृत्तसंस्था
भारताला दोनवेळा आयसीसी विश्वचषक जिंकून देणाऱया माजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीने शनिवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अनपेक्षित निवृत्ती स्वीकारत अवघ्या क्रिकेट जगताला आश्चर्याचा धक्का दिला. या निर्णयामुळे मागील वर्षभरापासून त्याच्या क्रिकेट कारकिर्दीबाबत जी अनिश्चितता निर्माण झाली होती, ती देखील संपुष्टात आली. अर्थात, 39 वर्षीय धोनी यापुढेही आयपीएल स्पर्धेत मात्र खेळत राहणार आहे.
‘आपल्या सर्वांच्या प्रेम व पाठिंब्याबद्दल खूप खूप आभार. आज सायंकाळी 7 वाजून 29 मिनिटापासून मला निवृत्त समजा’, असे धोनीने शनिवारी आपल्या इन्स्टाग्राम हँडलवरुन नमूद केले. शुक्रवारी आयपीएल प्रँचायझी चेन्नई सुपरकिंग्सच्या ताफ्यात दाखल झाल्यानंतर 24 तासांच्या आतच त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. गतवर्षी जुलै महिन्यात इंग्लंडमध्ये संपन्न झालेल्या आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्धचा सामना धोनीसाठी शेवटचा ठरला.
क्रिकेटिंग बेन विशेष लक्षवेधी
रनिंग बिटविन विकेटचा मास्टर मानल्या जाणाऱया धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संघाला नेहमीच नवी उंची गाठून देण्याचे अनेक शिखर गाठले आणि यामागे त्याचा ‘क्रिकेटिंग बेन’ विशेष लक्ष वेधून घेणारा ठरला. गतवर्षी आयसीसी विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताला पराभव स्वीकारावा लागला, त्या लढतीनंतर धोनीने एकही व्यावसायिक क्रिकेट लढत खेळली नाही. त्यामुळे देखील त्याच्या कारकिर्दीबाबत बरीच अनिश्चितता निर्माण झाली होती.
रांचीसारख्या छोटय़ा ठिकाणाहून आलेल्या धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले. 350 वनडे, 90 कसोटी व 98 टी-20 सामन्यात त्याचा झंझावात अवघ्या क्रिकेट वर्तुळाने अनुभवला. मात्र, कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यात त्याला ढासळता फॉर्म, वाढते वय आणि वाढती टीका, अशा तिहेरी संकटाचा सातत्याने सामना करावा लागला. तरीही, मुख्यत्वेकरुन 5 ते 7 व्या स्थानी खेळत असताना देखील वनडे क्रिकेटमध्ये त्याने 50 पेक्षा अधिक सरासरीने केलेल्या 10773 धावा त्याचे मोठेपण सिद्ध करणाऱया ठरल्या.
मर्यादित षटकांच्या क्रिकेटला प्राधान्य
2014 मध्ये कसोटी क्रिकेटमधून अनपेक्षित निवृत्ती स्वीकारणाऱया धोनीने त्यानंतर मर्यादित षटकांच्या क्रिकेटवर लक्ष केंद्रित करणे अधिक पसंत केले. पण, तरीही त्याने कसोटी क्रिकेटमध्ये देखील भारताला सर्वाधिक 27 विजय मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला. कसोटीत त्याने 38.9 च्या सरासरीने 4876 धावांचे योगदान दिले. अर्थात, धोनीच्या क्रिकेट कारकिर्दीचे अवलोकन करण्यासाठी धावा हा निकष कधीच परिपूर्ण ठरणार नाही. कारण, त्याची मैदानावरील केवळ हजेरी देखील प्रतिस्पर्ध्यांच्या काळजात धस्स करणारी ठरली.
कुशल नेतृत्व हे बलस्थान
धोनीचे कुशल नेतृत्व हे त्याचे सर्वात बडे बलस्थान ठरत गेले आणि विजय खेचून आणण्याची त्याची हातोटी जागतिक क्रिकेटने सातत्याने अनुभवले. 2007 टी-20 विश्वचषक स्पर्धेत नवख्या जोगिंदर शर्माकडे शेवटचे षटक देण्याचा निर्णय असो किंवा 2011 वनडे विश्वचषक स्पर्धेच्या फायनल लढतीत बहरातील युवराज सिंगऐवजी स्वतः बढतीवर जाण्याचा निर्णय असो, धोनीच्या अशा असंख्य चाली भलत्याच यशस्वी ठरल्या आणि याच बळावर धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील जणू अनभिषिक्त सम्राट ठरला.
चेन्नईसाठी उचलला मोलाचा वाटा
आयपीएलमध्ये देखील त्याने चांगलेच साम्राज्य गाजवले आणि यामुळे त्याला ‘थाला’, असे प्रेमळ टोपण नाव बहाल केले गेले. आयपीएलच्या व्यासपीठावर त्याने चेन्नई सुपरकिंग्स संघाला चक्क तीनवेळा जेतेपदावर कब्जा करवून दिला. 2013 स्पॉट फिक्सिंग प्रकरणामुळे दोन वर्षांचे निलंबन सोसून परतल्यानंतर त्याने चेन्नईला मिळवून दिलेले यश विशेष महत्त्वाचे ठरले. सीएसकेचे सीईओ कासी विश्वनाथन यांनी दिग्गज फलंदाज धोनी किमान 2022 पर्यंत तरी चेन्नई संघातर्फे निश्चितपणाने खेळत राहील, असा आशावाद व्यक्त केला.
धोनीने 19.29 हीच वेळ का निवडली?
भारताला न्यूझीलंडविरुद्ध आयसीसी विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभव स्वीकारावा लागला होता, त्यावेळी इंग्लंडमध्ये स्थानिक प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 7.26 वाजले होते. त्यानंतर ग्रँट इलियॉटने 7 वाजून 29 मिनिटांनी भारत स्पर्धेतून बाद झाल्याचे ट्वीट केले होते. धोनीने शनिवारी सायंकाळी 7.29 ला निवृत्ती जाहीर केली, त्यावेळी हाच योगायोग चर्चेत राहिला.
ज्यावेळी बारावी परीक्षेपेक्षाही क्रिकेट लढतीला महत्त्व दिले!
दहावीत 66 टक्के व बारावीत 56 टक्के गुण प्राप्त करणाऱया धोनीचा क्रिकेटकडेच अधिक ओढा होता. एकदा बारावीची परीक्षा असताना त्याच दिवशी धोनीला एका स्पर्धेतील अंतिम सामना खेळायचा होता. सामना संपवून रेल्वेने परीक्षा केंद्रावर पोहोचत पेपर द्यायचा, असा त्याचा विचार होता. पण, वडिलांना कसे सांगायचे, हा प्रश्न त्याच्यासमोर होता. त्याने भीत-भीतच वडिलांना विचारले आणि वडिलांनी सहजपणे परवानगी देताना त्याला सांगितले, केवळ काही तासांच्या धावपळीमुळे काहीच फरक पडणार नाही. वर्षभर अभ्यास केला असशील तर तू निश्चितपणाने उत्तीर्ण होशील……अन् आश्चर्य म्हणजे धोनीने तो सामना खेळला आणि नंतर त्या पेपरमध्येही यश मिळवले.
होय! निवृत्तीनंतर धोनी त्याच क्षेत्रात जाणार!
गतवर्षी आयसीसी वनडे विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्ध पराभव स्वीकारावा लागल्यानंतर धोनी व्यावसायिक क्रिकेटपासून पूर्णपणे अलिप्त राहिला. अर्थात, यातील बराच कालावधी त्याने लष्करी सेवेत व्यतित केला. धोनी लष्करात मानद लेफ्टनंट कर्नल पदावर कार्यरत आहे. या वर्षभरात काही वेळा तो रांचीतील आपल्या फार्म हाऊसवर जैविक शेतीत रमला तर काही वेळा नेटस्मध्ये सराव करत त्याने माध्यमांना व आपल्या चाहत्यांना आणखी पेचात टाकले. अर्थात, आता रितसर निवृत्ती जाहीर केल्यानंतर धोनी पुन्हा एकदा आपल्या पसंतीच्या लष्करी सेवेकडे मोर्चा वळवेल, असे सध्याचे संकेत आहेत.
धावचीतने कारकीर्दची सुरुवात आणि धावचीतनेच सांगता!
90 कसोटी, 350 वनडे व 98 टी-20 क्रिकेट सामने खेळणाऱया धोनीचे रनिंग बिटविन द विकेटवर विशेष हुकूमत होती. पण, आश्चर्य म्हणजे त्याच्या कारकिर्दीची सुरुवात देखील धावचीतनेच झाली आणि सांगता देखील धावचीतनेच झाली.
धोनीच्या कारकिर्दीतील मुख्य घटनाक्रम
डिसेंबर 2004 : बांगलादेशविरुद्ध चित्तगाव वनडेत आंतरराष्ट्रीय पदार्पण
ऑक्टोबर 2005 : बढतीवर फलंदाजीला येत धावांचा पाठलाग करताना 145 चेंडूत 183 धावांची आतषबाजी.
डिसेंबर 2005 : चेन्नइत श्रीलंकेविरुद्ध कसोटी पदार्पण
सप्टेंबर 2007 : वनडेत सर्वाधिक 6 बळींच्या गिलख्रिस्टच्या विक्रमाशी बरोबरी. दक्षिण आफ्रिकेत संपन्न झालेल्या आयसीसी टी-20 विश्वचषक जिंकून देण्यातही यश. अननुभवी जोगिंदर शर्माला शेवटचे षटक देण्याची चाल फळली.
ऑगस्ट 2008 : लंकन भूमीत भारताला पहिलीच द्विसंघीय मालिका जिंकून दिली.
ऑगस्ट 2008 : राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित.
नोव्हेंबर 2008 : अनिल कुंबळे निवृत्त झाल्यानंतर धोनीकडे पूर्णवेळ कसोटी संघाच्या नेतृत्वाची धुरा. ऑस्ट्रेलियाविरुद्ध चौथ्या व शेवटच्या कसोटीपासून सूत्रे स्वीकारली.
डिसेंबर 2008 : वर्षातील सर्वोत्तम आयसीसी वनडे खेळाडू पुरस्काराने सन्मानित.
एप्रिल 2009 : पद्मश्री या देशातील सर्वोच्च चौथ्या नागरी पुरस्काराने सन्मान.
डिसेंबर 2009 : धोनीच्या नेतृत्वाखाली भारत आयसीसी क्रिकेट मानांकन यादीत प्रथमच अव्वल.
डिसेंबर 2009 : वर्षातील सर्वोत्तम वनडे खेळाडू पुरस्कार कायम राखणारा पहिला खेळाडू बनला.
मे 2010 : धोनीने मुंबई इंडियन्सल 22 धावांनी नमवत चेन्नईला आयपीएल जेतेपद मिळवून दिले.
एप्रिल 2011 : श्रीलंकेविरुद्ध आयसीसी वनडे फायनल लढतीत 79 चेंडूत 91 धावांची अविस्मरणीय सामना जिंकून देणारी खेळी साकारली व भारताने 28 वर्षांनंतर भारताला विश्वचषक जिंकून दिला. नुवान कुलसेकराला लाँगऑनच्या दिशेने धोनीने खेचलेला षटकार आजही रसिक क्रिकेटप्रेमींच्या मनात तितकाच ताजातवाना आहे.
मे 2011 : धोनीने कर्णधार या नात्याने चेन्नईला आयपीएलचे जेतेपद राखून दिले. अंतिम फेरीत त्यांनी आरसीबीचा 58 धावांनी धुव्वा उडवला.
नोव्हेंबर 2011 : भारतीय लष्कराने मानद लेफ्टनंट कर्नल पदाने सन्मानित केले.
मार्च 2013 : सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार बनण्यात यश. सौरभ गांगुलीचा 49 कसोटीत 21 विजयाचा विक्रम मागे टाकला.
जून 2013 : धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने आयसीसी चॅम्पियन्स चषक स्पर्धा जिंकली. इंग्लंडला अंतिम फेरीत 5 धावांनी नमवले. धोनी तिन्ही आयसीसी ट्रॉफी जिंकणारा पहिला कर्णधार ठरला.
फेब्रुवारी 2013 : कसोटी क्रिकेटमध्ये पहिलेच द्विशतक झळकावले. 365 चेंडूत 224 धावांची खेळी साकारत एखाद्या भारतीय यष्टीरक्षकातर्फे सर्वोच्च कसोटी धावांचा बुद्धी कुंदेरनचा 192 धावांचा विक्रम मोडला.
मार्च 2013 : भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्या भूमीत 4-0 अशा फरकाने कसोटीत नमवले.
मे 2018 : धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई तिसऱयांदा आयपीएल विजेता. अंतिम लढतीत सनरायजर्स हैदराबादला 8 गडी राखून नमवले.