नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारताला दोनवेळा आयसीसी विश्वचषक स्पर्धा जिंकून देणारा कर्णधार महेंद्रसिंग धोनी लवकरच वनडे कारकिर्दीचा समारोप करेल. नजीकच्या कालावधीत तो वनडेतून निवृत्त होऊ शकतो, असे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री गुरुवारी म्हणाले. टी-20 मध्ये तो किती खेळेल, हे आगामी आयपीएल स्पर्धेवर अवलंबून असेल. आयपीएलमध्ये उत्तम कामगिरी झाल्यास तो ऑस्ट्रेलियातील टी-20 विश्वचषक स्पर्धेत खेळू शकतो, असेही शास्त्रीनी स्पष्ट केले. चार दिवसांच्या कसोटी संकल्पनेवर त्यांनी यावेळी कडाडून टीका केली.
‘मी महेंद्रसिंग धोनीशी याबाबत संवाद साधला आहे. त्याने कसोटी क्रिकेटचा यापूर्वीच समारोप केला. यानंतर तो वनडेमधून निवृत्त होण्याचा निर्णय लवकरच जाहीर करु शकतो. तो सर्व क्रिकेट प्रकारात सातत्याने खेळत आला आहे, यामुळे आपल्याला त्याच्या निर्णयाचा आदर करावा लागेल’, असे ते म्हणाले.
‘सध्याचे धोनीचे वय पाहता, तो फक्त टी-20 क्रिकेटच खेळू इच्छितो. याचाच अर्थ असा की, तो नव्याने सुरुवात करेल. आता सर्वप्रथम आयपीएलमध्ये तो खेळेल आणि शरीराची कशी साथ लाभते, हे आजमावून पाहील. 38 वर्षीय धोनीत अद्याप क्रिकेट बाकी आहे आणि टी-20 विश्वचषक स्पर्धेत तो खेळेल, अशी आम्हाला अपेक्षा आहे. अर्थातच, आयपीएलमध्ये त्याची कामगिरी कशी होते, ते महत्त्वाचे असेल’, असे शास्त्री यांनी पुढे बोलताना स्पष्ट केले.
‘ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी संघनिवड करताना प्रत्येक खेळाडू, त्याचा फॉर्म व अनुभव या बाबी विशेष विचारात घेतल्या जातील. धोनीने आयपीएलमध्ये लक्षवेधी कामगिरी केली तर तो निश्चितच वर्ल्डकपसाठी शर्यतीत येईल’, असे शास्त्री याप्रसंगी शेवटी म्हणाले.
धोनी यापूर्वी जुलैमध्ये इंग्लिश भूमीत संपन्न झालेल्या आयसीसी विश्वचषक स्पर्धेत भारताकडून शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. न्यूझीलंडविरुद्धच्या त्या उपांत्य लढतीत धोनी अर्धशतक झळकावल्यानंतर धावचीत झाला. भारताला तो सामना गमवावा लागला आणि त्यानंतर धोनीने एकही व्यावसायिक लढत खेळलेली नाही. त्यामुळे, धोनीचे पुनरागमन कधी, हा प्रश्न अनुत्तरित होता. स्वतः धोनीनेही याबाबत जानेवारीपर्यंत काहीही विचारु नका, असे स्पष्ट केले होते.
सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील मुख्य प्रवाहातून बाहेर असणाऱया धोनीने भारतीय संघातर्फे आतापर्यंत 350 वनडे, 90 कसोटी व 98 टी-20 सामने खेळले असून यष्टीमागे एकत्रित 829 बळी घेतले आहेत.
धोनीच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीवर दृष्टिक्षेप
-/सामने / धावा / सर्वोच्च / शतके / अर्धशतके / झेल / यष्टीचीत
कसोटी / 90 / 4876 / 224 /6 / 33 / 256 / 38
वनडे / 350 / 10773/ 183* / 10 / 73 / 321 / 113
टी-20 / 98 / 1617 / 56 / 0 / 2 / 57 / 34