सातवेतील तरुणाची एमपीएससीच्या प्रवासातील यशोगाथा
कोल्हापूर / दीपक चौगले
माझे आजोबा नेहमी म्हणायचे की, पोरांनो आयुष्यात खूप मोठं व्हा. इतकं मोठं व्हा की, त्यामाध्यमातून आपल्याला लोकांची सेवा करता आली पाहिजे. हे त्यांचं वाक्य नेहमी डोक्यात घुमू लागलं आणि मलाही सामान्य माणसांसाठी प्रशासकीय सेवेच्या माध्यमातून काम करण्याची इच्छा झाली. आणि तिथेच स्पर्धा परीक्षेssमधून उपजिल्हाधिकारी पद खेचून आणण्याचा चंग बांधला. अखेर एसटीआय, आरएफओ, डीवायएसपी, तहसीलदार या पदानंतर उपजिल्हाधिकारी पदाला गवसणी घातली, अशा शब्दांत सातवे (ता. पन्हाळा) येथील प्रसन्नजित प्रकाश चव्हाण याने आपल्या भावना व्यक्त केल्या.
प्रसन्नजित याने वारणा कॉलेजमधून मॅपेनिकल इंजिनीयरची पदवी मिळवल्यानंतर 2015 मध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. अभ्यास सुरू करतानाच त्याने उपजिल्हाधिकारी पदाचे `लक्ष्य’ निर्धारित केले होते. 2017 मध्ये पहिले यश एसटीआय (सेल्स टॅक्स ऑफिसर) मिळाले. 2018 मध्ये आरएफओ (रेंज फॉरेस्ट ऑफिसर), 2019 मध्ये डीवायएसपी (राज्य उत्पादन शुल्क खाते), 2020मध्ये तहसीलदारपदी निवड झाली. मात्र उपजिल्हाधिकारी होण्याच्या दुर्दम्य इच्छाशक्तीमुळे जोमाने अभ्यास केला, चुका शोधल्या आणि अखेर उपजिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण झाले, प्रसन्नजित सांगत होता.
प्रसन्नजितचे वडील प्रकाश मारूती चव्हाण हे निवृत्त केंद्रप्रमुख आहेत. तर आई प्रतिभा या गृहिणी आहेत. बहीण सातारा नगरपालिकेत करनिर्धारण अधिकारी तर भाऊ प्रवीण इंजीनियर आहे. कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे एवढे मोठे यश मिळवू शकलो, अशी भावना प्रसन्नजितने व्यक्त केली.
चुका शोधल्या; संदर्भ पुस्तकांमधून स्वत:च्या नोट्स
अभ्यासामध्ये सातत्य होते. मात्र एक-दोन गुणांनी उपजिल्हाधिकारी पद हुकत होते. 2018 मध्ये 12, तर 2019 मध्ये दोन गुणांनी हे पद दूर गेले होते. मात्र यापूर्वी हेत असलेल्या चुकांचे निरीक्षण केले. एखाद्या विषयाची तीन-तीन संदर्भपुस्तके वाचून त्याची एक समरी काढून अभ्यास केला. तसेच मुलाखतीच्या तयारीसाठी वरिष्ठांनी मदत आणि कामात सवलतही दिली. उत्तरे लिहिताना घाईघडबडीत चुका व्हायच्या त्या प्रत्येकवेळी सुधारत गेल्यामुळे हे यश प्रसन्नजितला मिळाले.
स्वप्न सत्यात उतरवा ; प्लॅन बीसुद्धा तयार ठेवा
यशाचा मार्ग खूप खडतर आहे. मात्र स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करायला हवी. अपयश येण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे तरुणांनो खचून न जाता दुसरा पर्यायी मार्ग निवडण्यासाठी प्लॅन बीसुद्धा तयार ठेवा. – प्रसन्नजित चव्हाण, उपजिल्हाधिकारी