अध्यक्षपदी विद्या मादार बिनविरोध : उपाध्यक्षपदी मन्सूर तासीलदार विजयी
वार्ताहर / नंदगड
नंदगड ग्राम पंचायतीच्या इतिहासात अध्यक्षपदाची निवडणूक प्रथमच बिनविरोध झाली आहे. अध्यक्षपदी विद्या जितेंद्र मादार यांची बिनविरोध निवड झाली. तर उपाध्यक्षपदी मन्सूर बाबासाब तासिलदार हे विजयी झाले.
नंदगड ग्राम पंचायतीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी गुरुवारी निवडणूक घेण्यात आली. अध्यक्षपद सामान्य महिलेसाठी व उपाध्यक्षपद सामान्यासाठी होते. अध्यक्षपदासाठी विद्या जितेंद्र मादार व वैष्णवी पाटील यांनी अर्ज दाखल केला होते. परंतु वैष्णवी पाटील यांच्या अर्जावर सूचकाची सही नसल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला. त्यामुळे निवडणूक रिंगणात विद्या मादार यांचा एकमेव अर्ज राहिल्याने त्यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.
उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मन्सूर तासिलदार विरुद्ध बसव्वा हत्तरवाड यांच्यात निवडणूक झाली. ग्राम पंचायतीत एकूण 23 सदस्य आहेत. परंतु निवडणुकीच्यावेळी 21 सदस्यच उपस्थित होते. उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत मन्सूर तासिलदार यांना 18 मते तर बसव्वा हत्तरवाड यांना 3 मते मिळाली. त्यामुळे उपाध्यक्षपदी मन्सूर तासिलदार हे विजयी झाल्याचे निवडणूक अधिकाऱयांनी जाहीर केले.
या निवडणुकीत सिद्धाप्पा नाईक, महंमदशफी काजी, निखहतप्रवीण तासिलदार, चंदू वड्डर, दीपा फातर्डे, निर्मला जोडंगी, नसीमाबेगम हेरेकर, संदीप पारिश्वाडकर, नीता देगांवकर, प्रदीपकुमार पवार, संगीता मड्डीमनी, प्रणाली तोरगल, सुजाता हुळभूत्ते, आशिया सय्यद, यल्लाप्पा गुरव, लक्ष्मण बोटेकर, बसव्वा हत्तरवाड, मोहम्मदअखिल चंदगडकर, नागेंद्र पाटील आदींनी सहभाग दर्शवला होता.
नूतन अध्यक्षा विद्या मादार यानी याच पंचायतीवर यापूर्वी ग्रामपंचायत उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. जि. पं. सदस्य जितेंद्र मादार यांच्या त्या पत्नी होत. नूतन उपाध्यक्ष मन्सूर तासिलदार यांनीही यापूर्वी याच पंचायतीवर सदस्य म्हणून काम पाहिले होते. वरील दोघांच्या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे. निवडीनंतर अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या समर्थकांनी फटाके वाजवून व गुलालाची उधळण करत विजयोत्सव साजरा केला.
नंदगड गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार
नंदगड गावच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन नूतन अध्यक्षा विद्या मादार यांनी निवडीनंतर बोलताना माहिती दिली.