अविश्वास ठरावासाठी एपीएमसी सचिवांकडे दहा संचालकांचे पत्र : अविश्वासाला सामोरे जाण्याचे आव्हान
वार्ताहर / नंदगड
नंदगड एपीएमसीचे अध्यक्ष हणमंत पाटील यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत. एक तर एपीएमसीची बैठक घेऊन अध्यक्षांनी स्वच्छेने राजीनामा द्यावा, अन्यथा अविश्वासाला सामोरे जावे. या संदर्भात एपीएमसीमधील दहा सदस्यांनी एपीएमसीच्या सचिवांकडे पत्र दिले आहे. त्यामुळे एपीएमसी अध्यक्ष हणमंत पाटील यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या कालावधीतील एपीएमसीचा कालावधी केवळ पंधरा महिने असतानाच अध्यक्ष बदलाच्या हालचाली जोरात सुरू आहेत. जुलै 2020 मध्ये भाजपाच्या हणमंत पाटील यांची बिनविरोध अध्यक्षपदी निवड झाली होती. त्यामुळे गेले चार-पाच महिने म. ए. समिती सदस्यांत असंतोष धुमसत होता. परंतु आपल्याला निवडून आणण्यासाठी पराकाष्टा केलेल्या एका नेत्याच्या धास्तीपोटी कुणीही यासंबंधी तोंड उघडत नव्हते. परंतु आता एपीएमसीमधील म. ए. समितीचे 9 सदस्य व अन्य काहीजण एकत्र आले असून अध्यक्ष हणमंत पाटील यांनी एक तर स्वखुशीने राजीनामा द्यावा, अन्यथा अविश्वास ठरावाला सामोरे जावे, अशी भूमिका घेतली असून लवकरच यासंदर्भात बैठक बोलावण्यासाठी एपीएमसी सचिवाकडे पत्र सादर केले आहे.
म. ए. समितीचे 9 सदस्य
नंदगड एपीएमसीमध्ये म. ए. समितीचे 9 सदस्य आहेत. तर भाजपाचे तीन व अन्य काही सदस्य आहेत. त्यामुळे एपीएमसीवर निर्विवाद म. ए. समितीचीच सत्ता आहे. साडेतीन वर्षापूर्वी या कालावधीतील संचालक मंडळासाठी एपीएमसीची निवडणूक झाली होती. त्या निवडणुकीत वरीलप्रमाणे संचालक निवडून आले होते. पहिल्या वेळेला म. ए. समितीचे संजय पाटील अध्यक्ष झाले होते. वीस महिन्यानंतर म. ए. समितीच्या रामचंद्र पाटील यांची अध्यक्षपदी वर्णी लागली होती. तर जुलै 2020 मध्ये तिसऱया टप्प्यातील वीस महिन्यासाठी अध्यक्षपदाच्या निवडीसाठी निवडणूक घेतली. त्यावेळी भाजपाचे हणमंत पाटील यांची बिनविरोध निवड झाली होती. एपीएमसीमध्ये म. ए. समितीची सत्ता असताना भाजपाच्या एका संचालकांची अध्यक्षपदी वर्णी लागल्याने म. ए. समिती सदस्यात नाराजी पसरली होती. निवडणुकीच्यावेळी म. ए. समितीच्या एकाही संचालकाने विरोधी अर्ज सादर न केल्याने निवडणूक बिनविरोध झाली होती.
अध्यक्ष बदलासाठी समितीचे विशेष प्रयत्न
दरम्यानच्या काळात म. ए. समिती संचालकांनी मूक गिळून गप्प बसणेच पसंत केले होते. आता चार-पाच महिन्यानंतर का होईना म. ए. समिती संचालक एकत्र आले असून त्यांनी आता अध्यक्ष बदलासाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत.