रस्ताकामाला तातडीने प्रारंभ
प्रतिनिधी /खानापूर
नंदगड गावापासून अडीच कि. मी. अंतरावर असलेल्या गवळी वाडय़ाला जाण्यासाठी रस्ता नव्हता. पाणंद रस्त्यावरून गवळी लोक ये-जा करत होते. या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी गवळीवाडय़ातील जनतेने केली होती. जि. पं. माजी सदस्य पुंडलिक कारलगेकर यांनी यासंदर्भात ग्रा. पं. कडे पाठपुरावा केला होता. ग्राम पंचायतीने याची दखल घेऊन अध्यक्षा विद्या मादार व ग्रा. पं. सदस्यांनी रोजगार हमी योजनेतून रस्त्यासाठी 10 लाखांचा निधी मंजूर केला. आता त्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे.
नंदगड गावाजवळील गवळीवाडय़ाला जाणाऱया पाणंद रस्त्यावरील काही भागात झाडेझुडपे वाढल्याने त्या रस्त्यावरून जाणे पादचाऱयांना कठीण झाले होते. यामुळे गवळीवाडय़ातील जनतेला संपर्क रस्त्याची समस्या निर्माण झाली होती. त्या रस्त्यावर वाढलेली झाडेझुडपे तातडीने बाजूला काढून रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी गवळीवाडय़ातील जनतेने नंदगड ग्रा. पं. कडे केली होती.
गवळीवाडा नंदगडपासून अडीच ते तीन कि. मी. अंतरावर आहे. पावसाळा वगळता इतर दिवसात त्या गवळीवाडय़ातील लोक शेतवाडीतील पायवाटेने ये-जा करतात. त्यांना पायवाटही अत्यंत जवळची आहे. पण पावसाळय़ात त्या मार्गावरील शेतीवाडीत भात पेरणी झाल्यावर ती पायवाट बंद होते. यामुळे पाणंद रस्त्याने जाण्या-येण्यावाचून मार्ग नाही. पण त्या रस्त्यावरील काही भागात झुडपे वाढून तो रस्ता झुडपात गडप झाला होता. यामुळे त्या ठिकाणाहून पायपीट करण्यात मोठी अडचण निर्माण झाली होती. त्या ठिकाणी जाणेदेखील कठीण झाले होते. यामुळे ती वाढलेली झाडेझुडपे बाजूला करून रस्त्याची दुरुस्ती करण्यावाचून दुसरा मार्ग नव्हता. नंदगड ग्राम पंचायतीने याची दखल घेऊन त्या ठिकाणी वाढलेली झाडेझुडपे बाजूला करून दोन्ही बाजूला गटारी खोदाव्यात व सदर मार्ग जाण्या-येण्यासाठी खुला करून गवळीवाडय़ासाठी जाणाऱया संपर्क रस्त्याची समस्या दूर करावी, अशी मागणी नंदगड ग्रा. पं. कडे केली होती.
यासंदर्भात दै. ‘तरुण भारत’ने छायाचित्रासह वृत्त प्रसिद्ध करून आवाज उठवला होता. जि. पं. माजी सदस्य पुंडलिक कारलगेकर यांनी नंदगड ग्रा.पं.शी संपर्क साधून गवळीवाडय़ातील जनतेला होणाऱया अडचणींची माहिती दिली होती. त्यावेळी नंदगड ग्रा. पं. अध्यक्षांनी एक-दोन दिवसात रस्ता खुला करून देण्याचे आश्वासन दिले होते. रस्त्यासाठी अनुदान मंजुरीचे आश्वासनही दिले होते. अखेर रस्त्यासाठी 10 लाख रु. मंजूर करून नंदगड ग्रा. पं. ने आश्वासनाची पूर्तता केली आहे. रस्त्याचे काम सुरू झाल्याने गवळीवाडय़ातील जनतेमधून समाधान व्यक्त केले जात आहे.