बेळगावच्या डायोसीसकडून आयोजन : परमेश्वराप्रती कृतज्ञता व्यक्त
प्रतिनिधी /बेळगाव
नंदगड येथील पवित्र प्रुसाच्या पायथ्याशी प्री-गुड फ्रायडे प्रार्थना सेवेचे आयोजन केले होते. उत्तर कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा आणि इतर भागातून मोठय़ा संख्येने यात्रेकरुंनी यात भाग घेतला होता. याचे बेळगावच्या डायोसीसने आयोजन केले होते. कोविड लॉकडाऊनच्या कटूस्मृती मागे ठेऊन दोन वर्षांनंतर यात्रेकरुंनी परमेश्वराप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि नंदगड येथील चमत्कारी क्रॉसचा आशीर्वाद मिळावा यासाठी त्यांच्या विनंत्या आणि प्रार्थना अर्पण केल्या.
इमॅक्मयुलेट कन्सेप्शन चर्च, नंदगड येथे सुरू झालेल्या विशेष लेंटन प्रार्थना सेवेने दिवसाची सुरुवात झाली. होली मास सर्व्हिसेसमध्ये विविध भागातून येणारे फादर्सनी विशेष प्रार्थना अर्पण केली. बेळगावचे बिशप रेव्ह. डॉ. डेरेक फर्नांडिस यांनी दुपारी झालेल्या प्रमुख प्रार्थनेत भाग घेतला.
पॅरिस प्रमुख फादर शांतप्पा बोरकर यांनी आपल्या प्रास्ताविक प्रार्थनेत देवाप्रती कृतज्ञता व्यक्त केली. परमेश्वर आपल्याला पुन्हा एकदा त्याच्या कृपेसाठी आमंत्रित करतो. म्हणून आपण चिंतन आणि मनन करुया आणि वधस्तंभावरील येशू ख्रिस्तासाठी प्रार्थना करूया, असे फादर बोरकर म्हणाले.
आपल्या प्रवचनात बिशप डेरेक फर्नांडिस यांनी पापांपासून दूर राहून पश्चात्ताप करण्यासाठी स्वतःला परमेश्वराच्या हवाली करा, असे सांगितले. सेंट पीटर आणि सेंट ज्यूड यांच्याप्रमाणे तुमच्या पापांची क्षमा केली जाईल असेही ते म्हणाले. यात्रेकरुंना होलीक्रॉसचा आशीर्वाद देण्यात आला.
या कार्यक्रमाला स्थानिक ग्राम समितीच्या सदस्यांनी यात्रेकरुंची सविस्तर व्यवस्था केली. दिवसभर ख्रिस्ती बांधवांचा ओढा नंडगड येथे सुरूच होता.