सुवेंदू अधिकारींच्या बालेकिल्ल्यात ममतादीदी रिंगणात
कोलकाता / वृत्तसंस्था
विधानसभा निवडणुकीसाठी 291 उमेदवारांची यादी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) प्रमुख ममता बॅनर्जी यांनी जाहीर केली आहे. स्वतः ममता बॅनर्जी नंदिग्राममधून निवडणूक लढवणार आहेत. तृणमूल काँग्रेसला सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेले सुवेंदु अधिकारी यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱया नंदिग्राममध्ये हय़ावेळेस तुंबळ राजकीय लढाई होण्याचे संकेत असून या लढतीकडे संपूर्ण देशाचे लक्ष असणार आहे. ममता बॅनर्जी यापूर्वी लढलेल्या भवानीपुर येथून सोवानदेब चॅटर्जी यांना संधी देण्यात आली आहे.
ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी यादी जाहीर करताच विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला कडवी झुंज देण्यासाठी आपण सज्ज असल्याचे स्पष्ट केले. 294 पैकी उत्तर बंगाल आणि इतर ठिकाणच्या तीन जागा मित्रपक्षांसाठी सोडल्या असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. उमेदवारी यादीमध्ये एकूण 50 महिला उमेदवार, 42 मुस्लीम उमेदवार, 79 अनुसूचित जातीमधील उमेदवार आणि 17 अनुसूचित जमातीमधील उमेदवार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. या निवडणुकीत टीएमसीने 80 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱया विद्यमान आमदारांना तिकीट नाकारले आहे. त्यानुसार 23-24 विद्यमान आमदारांची नावे वगळली असून यामध्ये पार्थ चटोपाध्याय यांच्यासह काही बडय़ा नेत्यांचा समावेश आहे.
क्रिकेटर मनोज तिवारी शिवपूरमधून लढणार
माजी क्रिकेटर मनोज तिवारीला पक्षाने हावडाच्या शिवपूरमधून उमेदवारी दिली आहे. तृणमूल काँग्रेसने हय़ावेळी सिनेतारकांसह विविध क्षेत्रातील चर्चेतील चेहऱयांना संधी दिली आहे. बांकुरा येथून फिल्मस्टार सायानतिका, उत्तरपाडाहून कंचन मलिक यांना तिकीट देण्यात आले आहे. गायिका अदिति मुंशी यांना राजरहाट, चंद्रिमा भट्टाचार्य यांना उत्तर डमडममधून संधी दिली आहे. ज्ये÷ तृणमूल नेते मदन मित्रा यांना कमरहाटी, मंत्री शशि पांजा यांना श्यामपुकुर येथून तिकीट देण्यात आले आहे.
10 मार्चला ममतादीदी उमेदवारी अर्ज भरणार
‘खेळू, लढू आणि जिंकू’ असा संदेश देत ममतांनी बंगालमध्ये तृणमूलचाच विजय होणार असल्याचा दावा केला. तसेच भाजप पैशांचा वापर करत असून गाडय़ांमधून पैसा आणला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच आपण 9 मार्चला नंदिग्राम दौऱयावर जाणार असून 10 मार्च रोजी हल्दिया येथे शक्तिप्रदर्शनासह अर्ज भरणार असल्याची घोषणाही ममतादीदींनी केली.
भाजपचा उमेदवार अजूनही गुलदस्त्यात
भाजपने अजून उमेदवारांची यादी जाहीर केलेली नसल्याने सुवेंदू अधिकारी कुठून लढणार हे स्पष्ट झालेले नाही. नंदिग्राम, भवानीपूरसह सुमारे 15 जागांवरील उमेदवारांच्या नावाचा अंतिम निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी, जेपी नड्डा आणि अमित शहा यांच्याकडे सोपविण्यात आल्याचे समजते. नंदिग्राममधून ममता बॅनर्जी यांच्याविरोधात मैदानात उतरल्यास आपण किमान 50 हजार मतांनी मुख्यमंत्र्यांचा पराभव करणार असल्याचा दावा सुवेंदू अधिकारी यांनी भाजपच्या बैठकीत केला होता. त्यामुळे सुवेंदू अधिकारी विरुद्ध ममता बॅनर्जी अशीच अटीतटीची लढत होण्याची चिन्हे आहेत.
ममतांसाठी बंगालमध्ये शिवसेनेची माघार
शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून शिवसेना पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक लढणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. शिवसेना पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक लढणार की नाही? हे जाणून घेण्याबद्दल असंख्य लोकांमध्ये उत्सुकता आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर याठिकाणी माहिती देत आहे. शिवसेना पश्चिम बंगालची निवडणूक लढणार नाही आणि ममतांना समर्थन असेल. आम्हाला आशा आहे की, ममता दीदींची डरकाळी पुन्हा एकदा यशस्वी होईल. कारण त्या खऱया बंगाली टायगर आहेत, यावर आमचा विश्वास आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे. दरम्यान निवडणुकीत पाठिंबा दिल्याबद्दल शिवसेनेसह तेजस्वी यादव, अरविंद केजरीवाल, हेमंत सोरेन यांचे ममता बॅनर्जी यांनी आभार मानले आहेत.