पंजाबमध्ये दहशतवाद पुनर्जिवीत करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल कारवाई
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पंजाबमध्ये दहशतवादाला पुनर्जिवीत करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल केंद्र सरकारने नऊ व्यक्तींना दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. हा निर्णय बेकायदा कृत्य विरोधी कायद्यानुसार (युएपीए) घेण्यात आला आहे. या व्यक्ती भारताबाहेरील असून त्यांनी पंजाबमध्ये दहशतवाद पुन्हा सुरू करण्यासाठी अनेक गुप्त हालचाली सातत्याने केल्या आहेत. ही माहिती मिळताच हा निर्णय घेण्यात आला.
दहशतवादी म्हणून घोषित केलेल्या या व्यक्तींमध्ये बब्बल खालसा इंटरनॅशनल, इंटरनॅशनल शीख युथ फेडरेशन, खलीस्तान झिंदाबाद फोर्स, खलीस्तान कमांडो फोर्स आणि खलीस्तान टायगर फोर्स तसेच शीख फॉर जस्टीस इत्यादी बेकायदा संघटनांच्या प्रमुखांचा समावेश करण्यात आला आहे.
वाधवा सिंग बब्बर, पाकस्थित इंटरनॅशनल शीख युथ फेडरेशनचा म्होरक्या लखबीर सिंग, पाकस्थित खलीस्तान झिंदाबाद फोर्सचा म्होरक्या रणजीतसिंग, पाकस्थित खलिस्तान कमांडो फोर्सचा परमजितसिंग तसेच भूपिंदरसिंग भिंडा, गुरूमित सिंग बग्गा, अमेरिकास्थित गुरूपतवंतसिंग पन्नुम, कॅनडास्थित हरदीपसिंग नज्जर आणि ब्रिटनस्थित परमजित सिंग अशी दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आलेल्यांची नावे आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने बुधवारी ही घोषणा केली.