कुंब्रलच्या तिघा युवकांकडून गिर गाईंचे पालन
नोकरीला केला कायमचा राम-राम
दरदिवशी 50 ते 60 लीटर दूध संकलन
समीर ठाकुर / दोडामार्ग:
गावातीलच दोन तरुणांचा आदर्श घेऊन कुंब्रलमधील युवकांनी लॉकडाऊनमध्ये रोजगाराचा पर्याय शोधत आदर्श निर्मण केला आहे. लॉकडाऊनमुळे गोव्यातील नोकरी गेल्यामुळे पुढे काय करावे, या विवंचनेत असताना गावातील दोन तरुणांचा आदर्श घेऊन ‘गिर’ जातीच्या गाई खरेदी करून या व्यवसायात भरारी घेतली आहे. यापूर्वी याच व्यवसायात गावातील अन्य दोन युवकांनी स्थैर्य प्राप्त केले आहे. आता या तिघांच्या माध्यमातून दरदविशी 70 ते 80 लिटर दूध या गिर गाईंपासून मिळत आहे. कुंब्रल-रुमडाची गोठण येथील उदय शेटये, विश्राम पालव व मनमोहन नाईक या तिघा युवकांनी गावात ‘गोकुळ’ निर्माण केले आहे.
लॉकडाऊनमुळे ना रोजगार, ना नोकरी अशा स्थितीत अनेक तरुण आहेत. अनेकजण उद्योगधंदे, नोकरीच्या शोधात आहेत. तर काहीजण हिंमत न हारता स्वत:चा व्यवसाय किंवा एकत्र येऊन उद्योगधंदा करण्याची किमया साधत आहेत. कुंब्रल-रुमडाची गोठण येथील तीन पदवीधर तरुणांनी गोसंवर्धनाच्या माध्यमातून ‘गिर’ जातीच्या गाई गुजरात राज्यातून आणत दुग्ध प्रकल्प राबविला आहे. यामधून दरदिवशी सुमारे 50 ते 60 लिटर दूध जमा होत असून गोवा येथे सुमारे साठ ते सत्तर रुपये लिटर दराने दुधाची विक्री करत या तरुणांनी आपला व्यवसाय सुरू केला आहे.
आज अनेकजण कुक्कुटपालन, पशुसंवर्धनकडे वळत आहेत. ज्यांच्याकडे जमीन आहे, पैसा आहे, अशीच मंडळी पशुसंवर्धन प्रकल्पाच्या माध्यमातून पुढे येत आहेत. मात्र, सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबातील सुशिक्षित तरुणांना असे प्रकल्प उभे करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पण, या सर्वावर मात करत कुंब्रल येथील या तरुणांनी परिस्थिती बदलण्याचे ठरविले. त्यांनी गोवा येथील नोकरी सोडून गिर पाई पालनाचा प्रकल्प हाती घेतला आहे.
‘त्या’ तिघांची आगळीवेगळी किमया
सुशिक्षित पदवीधर असलेले उदय गोविंद शेटये, विश्राम शांताराम पालव आणि मनमोहन रामा नाईक या तिघा तरुणांनी ही किमया साधली आहे. कुंब्रल गावात दुग्ध सहकारी संस्था आहेत. अनेक शेतकरी गाई-म्हशींचे पालन करतात. मात्र, याकडे उद्योग, रोजगार म्हणून आतापर्यंत कधी कोणी पाहिले नव्हते. मात्र, या तिघांनी गोव्यातील नोकरीला रामराम करत जिल्हा बँकेच्या माध्यमातून कर्ज घेत गुजरातमधून ‘गिर’ जातीच्या गाई खरेदी केल्या. त्यातून दुग्ध प्रकल्पही सुरू केला. सुरुवातीला गावात तीन वर्षांपूर्वी मनमोहन रामा नाईक या तरुणाने दोन गिर गाई आणल्या. सुरुवातीला एक लिटर दूध गोव्यात देण्यास सुरुवात केली. त्यानंतर हळुहळू दिवसाला 20 ते 25 लिटर दूध सुरू केले. त्याचा आदर्श घेत याच वाडीतील विश्राम शांताराम पालव या तरुणाने वर्षभरापूर्वी गीर गाई खरेदी केल्या. तोही या व्यवसायात उतरला. या दोघा तरुणांनी व्यवसायात उडी घेताच गोवा येथे नोकरीत असलेल्या उदय गोविंद शेटये याचीही पावले या प्रकल्पाकडे वळली. कोरोना काळात गोवा सीमा बंद असल्यामुळे त्याच्या रोजगार- नोकरीचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, त्याचा बाऊ न करता त्याने दोन्ही तरुणांच्या पावलावर पाऊल ठेवून आपणही दोन गिर गाई गुजरात येथून आणल्या आणि दुग्ध प्रकल्प सुरू केला. एका गाईपासून दिवसाला 5 ते 6 लिटर दूध मिळते. तर एका गाईची किंमत 70 हजार ते एक लाख रुपये आहे.
या तिघाही तरुणांकडे सध्या सुमारे पंधरा गिर गाई आहेत. या तिघांनी स्वतःचा प्रत्येकी एक अद्ययावत गोठा उभा केला आहे. सध्या सुमारे 50 ते 60 लीटर दूध दिवसाला मिळत असून ते गोवा येथे नेऊन विकले जात आहे.
बेरोजगारांसाठी प्रेरणादायी प्रकल्प
या तिन्ही युवकांनी या व्यवसायाचा कोणताही अनुभव नसताना या व्यवसायात पाऊल टाकून जिद्दीच्या जोरावर यशस्वी केला. गाईंचे पालन पोषण तसेच त्यांची निगा व दूध काढणे वगैरे कामे हे युवक स्वत: करत आहेत. हे तिघेही पदवीधर आहेत. त्यातील एकजण इंजिनिअरींग डिप्लोमा केलेला तर उर्वरित दोघे पदवीधर आहेत. या गिर गाईंना लागणारा गवत, चारा ते स्वतः उपलब्ध करत आहेत. या तिघा तरुणांचा प्रकल्प पाहण्यासाठी दोडामार्ग तालुक्यातील अनेकजण आवर्जून भेट देत आहेत. या तिघांनी टाकलेले पाऊन अनेक बेरोजगार तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.