ऑनलाईन टीम / रायपूर :
माओवाद्यांचे समर्थक असल्याच्या आरोपावरून छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यातील भाजप नेत्यासह अन्य एकाला पोलिसांनी अटक केली आहे. दंतेवाडा पोलीस अधीक्षक अभिषेक पल्लावा यांनी एका वृत्तसंस्थेला याबाबतची माहिती दिली आहे.
रमेश उसेन्डी आणि जगत पुजारी अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, जगत पुजारी हा भाजपचा दंतेवाडा जिल्हा उपाध्यक्ष असून, तो बारसूर गावचा रहिवासी आहे. नक्षलवाद्यांच्या वाहतुकीसाठी त्याने ट्रॅक्टर उपलब्ध करून दिल्याचा त्याच्यावर आरोप आहे. पुजारी नक्षलवाद्यांना मदत करत असल्याची माहिती दंतेवाडा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी पुजारीच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवले होते. नक्षलवाद्यांच्या वाहतुकीसाठी त्याने 4 लाख रुपयांना ट्रॅक्टर खरेदी केल्याचे तपासात समोर आले. त्यानंतर पुजारीसह त्याला मदत करणाऱ्या उसेन्डीला पोलिसांनी अटक केली.