निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा :महिला, ओबीसी, एससी, एसटी राखीवता
प्रतिनिधी / पणजी
राज्यातील 11 नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी काल शुक्रवारी आरक्षण जाहीर करण्यात आले. मात्र पणजी महानगरपालिकेचा यात समावेश नाही. या आरक्षणामुळे आता निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नगरविकास खात्याचे संचालक गुरुदास पिळर्णकर यांनी याबाबतची अधिसूचना जारी केली आहे.
मडगाव, मुरगांव, म्हापसा, कुडचडे-काकोडा, केपे, कुंकळ्ळी, काणकोण, पेडणे, डिचोली, सांगे, वाळपई आदी 11 पालिकांचा या अधिसूचनेत समावेश करण्यात आला आहे.
एकुण 8 नगरपालिकांमध्ये एससी म्हणजेच अनुसूचित जातीच्या उमेदवारांना तर, 6 नगरपालिकांत एसटी म्हणजेच अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना आरक्षण प्राप्त झाले नाही. सर्व पालिकांमध्ये महिला आणि ओबीसी वर्गासाठी आरक्षण देण्यात आले आहे. अधिसूचनेत सर्वसाधारण गटासाठी कोणते प्रभाग आहेत, याचा उल्लेख नसल्याने या गटातील उमेदवारांना त्यांचे प्रभाग समजून घेण्यासाठी कष्ट घ्यावे लागणार आहेत. ज्या प्रभाग क्रमांकाचा उल्लेख अधिसूचनेत नाही ते प्रभाग सर्वसाधारण गटासाठी असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.