ऑनलाईन टीम / नगर :
सैन्यदलात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तरुणांना लाखो रुपयांना गंडा घालणाऱ्या तोतया कमांडोला अहमदनगरमध्ये अटक करण्यात आली आहे. नवनाथ गुलदगड असे या तोतया कमांडोचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नवनाथ गुलदगड हा सैन्यात कमांडो असल्याचे लोकांना सांगत होता. त्याने त्याच्या स्कॉर्पिओ गाडीवरही कमांडो असे लिहिले होते. संगमनेर, राहुरी, राहता आणि अकोला या भागातील काही तरुणांना त्याने सैन्यभरतीचे आमिष दाखविले. तसेच या तरुणांकडून त्याने आठ लाख रुपये उकळले होते. मात्र, या तरुणांना नोकरी न लावल्याने त्यांनी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती. त्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. संबंधित तोतया राहुरी परिसरात फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली आहे. त्याच्याकडे बनावट ओळखपत्र, युनिफॉर्म तसेच युनिफॉर्मवर असलेली नेमप्लेट, छापील बनावट नियुक्तीपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड पोलिसांनी जप्त केलं आहे.