तृणमूल उमेदवारीसाठी इच्छुक, मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसादाचा दावा
प्रतिनिधी /मडगाव
मडगाव मतदारसंघात तृणमूल काँग्रेसची उमेदवारी मिळवून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेले मडगाव पालिकेचे नगरसेवक महेश आमोणकर यांनी घरोघरी प्रचारावर भर दिला असून मतदारांकडून आपणास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
नुकतीच आपण चिंचाळ आणि कालकोंडा येथील प्रभाग 16 मधील घरोघरी भेटीची पहिली फेरी पूर्ण केली असून मतदारांनी त्यात आपणास उत्तम प्रतिसाद दिलेला आहे, असे त्यांनी सांगितले. मडगावातील मतदारांना यंदा बदल पाहिजे असे दिसून येते. मतदारांनी तसे आपणास बोलून दाखविले आहे, असा दावा आमोणकर यांनी केला. मागील 27 वर्षे काँग्रेसचे आमदार दिगंबर कामत मडगाव मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत असून मतदारसंघाचा विकास मागील अडीच दशके झाला नसल्याने सध्याच्या स्थानिक आमदारांना जनता कंटाळली आहे. आपण पेड, खारेबांद, खारेले परिसराचा समावेश असलेल्या प्रभाग 15 चे नगरसेवक म्हणून प्रतिनिधीत्व करत असून आपल्या प्रभागातील जनता आपल्यामागे खंबीरपणे उभी आहे, असा दावाही आमोणकर यांनी केला.
आमदार कामत यांच्या काँग्रेसप्रणित पॅनलच्या उमेदवाराचा भरघोस मतांनी पराभव करून आणि स्वतंत्र उमेदवार म्हणून निवडणूक लढवून आपण नगरसेवक बनलो. या निकालातून काँग्रेसकडे मतदार पाठ फिरवत असल्याचे स्पष्ट झाले होते. आपण नगरसेवक बनल्यानंतर जनहितार्थ विषय हातात घेताना समस्या सोडविण्याचे प्रयत्न केले आहेत. कित्येक वर्षे झाली, तरी स्थानिक आमदारांना कब्रस्तानचा प्रश्न सोडविण्यात अपयश आले आहे. मुस्लिम बांधवांना सोनसडा येथे कब्रस्तानसाठी दिलेल्या जमिनीचा झोन बदलण्यात आल्याने कब्रस्तानच्या उभारणीत अडचणी निर्माण झाल्या होत्या. यासंदर्भात मुख्यमंत्री व नगरनियोजनमंत्र्यांपर्यंत सर्वांना निवेदने सादर केली गेली तसेच पालिकेवर मोर्चा नेले गेले. शेवटी आपण पालिका इमारतीखाली आमरण उपोषण केल्यानंतर सरकारने सदर झोन बदल मागे घेण्याचे आश्वासन दिले, हे आमोणकर यांनी नजरेस आणून दिले. मडगाव मतदारसंघाचा चौफेर विकास करण्यासाठी आपले प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.