सोलापूर / प्रतिनिधी
महापालिकेच्या विषय समिती निवडीमध्ये भाजपला उघडउघड मतदान करून त्यांचा उमेदवार निवडून आणल्याच्या करणावरून एमआयएएम प्रदेशाध्यक्ष अब्दुल गाफर कादरी यांच्या पत्रानुसार नगरसेविकास तस्लिम शेख यांची पक्षातून हकालपट्टी केल्याची माहिती शहराध्यक्ष फारुक शाब्दी यांनी दिली.
महापालिकेतील एमआयएमच्या ताकदीवर निवडून आल्यानंतर स्वहितासाठी पक्षाला धोका देणार्या कोणत्याही नगरसेवकांची गय केली जाणार नाही. विषय समितीमध्ये तस्लीम इरफान शेख यांनी व्हिडिओ कॉलद्वारे भाजपच्या उमेदवाराला उघडपणे मतदान करून निवडून आणले. स्थानिक पातळीवर घडलेल्या प्रत्येक घटनेची माहिती हैदाराबाद येथील वरिष्ठ पक्षप्रमुखांना कळविण्यात आले. त्यांनी पाठविलेल्या पत्रानुसार पक्षातून त्यांना काढून टाकण्यात येत असल्याचेही यावेळी सांगितले. तसेच आणखी काही नगरसेवक स्वहितासाठी इकडे-तिकडे पळापळ करत आहेत.
त्यांच्या प्रत्येक कृतीवर पक्ष बारकाईने नजर ठेवून आहे. त्यांचाही नंबर लवकरच लागणार आहे. तत्पूर्वी पक्षाने दिलेल्या आदेशानुसार शेख यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. यापुढे महापालिकेत ते कोणतीही भूमिका घेतल्यास तो त्यांचा वैयक्तिक भूमिका असेल पक्षाचा नसेल, असे स्पष्टीकरणही शाब्दी यांनी यावेळी दिले.