निवडणूक लांबणीवर टाकण्याचे षडयंत्र : नगरसेवक घनश्याम शिरोडकर यांचा दावा
प्रतिनिधी / मडगाव
मडगाव पालिकेच्या आज शुक्रवारी होणाऱया निवडणुक प्रक्रियेत गैरप्रकार होण्याची शक्यता वर्तविताना सदर निवडणूक पुढे ढकलण्याचे षड्यंत्र रचले जात असल्याचा दावा नगरसेवक तसेच निवडणुकीतील स्वतंत्र उमेदवार घनश्याम प्रभू शिरोडकर यांनी पत्रकार परिषदेत केला. या निवडणुकीसाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी, जे निवडणूक अधिकारी म्हणून उपस्थित राहणार आहेत, त्यांना गैरप्रकार होण्याची शक्यता असल्याचे पत्र लिहून कळविले असल्याचे शिरोडकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्याची आणि मतदान प्रक्रिया गुप्त ठेवण्याची विनंती त्यांनी केली आहे. गोवा नगरपालिका (अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणूक) नियम, 1969, कलम 7 (2) नुसार, अध्यक्षपदाची निवडणूक गुप्त मतदानाने होणे आवश्यक आहे. शिवाय, नियम 7 (5) मध्ये असेही म्हटले आहे की, नगरसेवक ज्या उमेदवाराला मतदान करू इच्छितो त्याच्या नावासमोर क्रॉस खूण करून त्याचे मत लपवण्यासाठी मतपत्रिका बंद करून पेटीत टाकणे आवश्यक आहे, असे शिरोडकर यांनी या पत्राद्वारे नजरेस आणून दिले आहे.
नगराध्यक्षपदासाठी मी माझा उमेदवारी अर्ज दाखल केलेला असून मला विश्वासार्ह स्रोतांद्वारे कळले आहे की, नगरसेवकांना त्यांचे मोबाईल फोन वापरून मतपत्रिकेवर मतदान केल्यानंतर छायाचित्र काढण्यास सांगितले गेले आहे. अशा प्रथेला परवानगी दिल्याने मतपत्रिकेच्या गुप्ततेचा भंग होईल आणि त्याचा परिणाम अयोग्य व पक्षपाती निवडणूक प्रक्रिया होण्यात होईल, असे मी उमेदवार या नात्याने सांगू इच्छितो. त्यासाठी मी विनंती करतो की, मतदानाच्या दिवशी सभागृहामध्ये मोबाईल फोन किंवा कॅमेरे किंवा कसलेही इलेक्ट्रॉनिक गॅजेट वापरण्यास बंदी घालावी. असे न केल्यास मला उच्च अधिकारिणीकडे वा उच्च न्यायालयाकडे जाण्यासारख्या कायदेशीर उपायांचा अवलंब करावा लागेल, असे घनश्याम प्रभू शिरोडकर यांनी स्पष्ट केले आहे.