दहा जणांचा मृत्यू, भाऊबीजेच्या दिवशी दुर्घटना
नगर / प्रतिनिधी
नगर जिल्हा शासकिय रुग्णालयातील अतिदक्षता विभागास शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत दहा जण मृत्यूमुखी पडले. भाऊबीजेच्या दिवशी सकाळी ही दुर्देवी घटना घडली. घटनेचे वृत्त कळताच जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली.
अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील कोविड विभागाचे अलीकडेच अतिदक्षता विभागात रूपांतर करण्यात आले होते. या अतिदक्षता विभागाला शनिवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास शॉकसर्केटमुळे अचानक आग लागली. आग व धुराचे लोट दिसल्यावर कर्मचारी व प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू केल्या. महापालिकेचे अग्निशमन पथक घटनास्थळी दाखल झाले. अतिदक्षता विभागात असलेल्या दहा रुग्णांचा यात मृत्यू झाला. यात चार महिला व सहा पुरुष यांचा समावेश आहे. त्यात रामकिसन विठ्ठल हरपुडे (वय-70), सीताराम दगडू जाधव ( 83), सत्यभामा शिवाजी घोडचौरे ( 65), कडूबाळ गंगाधर खाटीक ( 65), शिवाजी सदाशिव पवार (82), दीपक विश्वनाथ जेडगुले ( 57), कोंडाबाई मधुकर कदम ( 77), आसराबाई नांगरे ( 58 ), छबाबी अहमद सय्यद ( 65) व एका अनोळखी अशा व्यक्तीचा समावेश आहे.
रुग्णालय परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. घटनास्थळाला जिल्हा जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अगरवाल, तोफखाना पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी, कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे, भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शशिकुमार देशमुख आदींनी भेट दिली.