बारा वाजेपर्यंत निकाल येणार हाती
प्रतिनिधी / सातारा :
जिल्हा बँकेच्या 10 जागांसाठी 20 उमेदवारांचे नशिब मतपेटीत बंद झाले असून, ते उद्या सकाळी 8 वाजता खुलणार आहे. मतमोजणीला मंगळवारी सकाळी सुरुवात होणार आहे. बारा वाजेपर्यंत संपूर्ण निकाल हाती येणार असून गुलाल कोणाच्या अंगावर उडणार हे उद्या पहायला मिळणार आहे. दरम्यान, उद्याच्या निकालामध्ये जावली, खटाव, पाटण, कराड आणि माण या तालुक्यांच्या निकालाकडे सगळयांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. दरम्यान, जिंकणार कोण यावर पैजा लागल्या आहेत. मतमोजणी जरंडेश्वर नाक्यावरील बँकर्सच्या हॉलमध्ये होणार आहे.
जिल्हा बेँकेच्या 10 जागांसाठी अगदी चुरशीने मतदान झाले असून मतमोजणीची तयारी निवडणूक निर्णय अधिकारी मनोहर माळी यांनी केलेली आहे. सकाळी 8 वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. 11 टेबलवर 11 सोसायटीकरता ही मतमोजणी प्रथम हाती घेण्यात येणार आहे. त्याकरता सुमारे 60 कर्मचारी नेमण्यात आलेले आहेत. सोसायटी मतदार संघाची मतमोजणी झाल्यानंतर बँकर्स मतदार संघाची मतमोजणी होणार आहे. त्यानंतर महिला अणि मागासवर्गीय मतदार संघाची मतमोजणी करण्यात येणार आहे. सर्व मतमोजणी दुपारी 12 वाजेपर्यंत स्पष्ट होणार आहे. मतमोजणीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आणि पोलीस बंदोबस्त सुरक्षितता म्हणून ठेवण्यात आलेला आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मनोहर माळी यांनी दिली आहे.