वृत्तसंस्था/ पॅरिस
जागतिक अग्रमानांकित नोव्हॅक जोकोविच, स्पेनचा राफेल नदाल, रशियाचा डॅनील मेदवेदेव्ह, कोरेन्टिन मुटेट, डेन्मार्कचा होल्गर सुने, एम्मा रॅडुकानू, अझारेन्का, पेत्र क्विटोव्हा यांनी प्रेंच ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेची दुसरी फेरी गाठली तर कॅनडाचा 14 वा मानांकित डेनिस शॅपोव्हॅलोव्ह, स्वित्झर्लंडचा स्टॅनिसलास वावरिंका व ऍनेट कोन्टाव्हेट यांना पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला.
सर्बियाच्या जोकोविचने जपानच्या योशिहितो निशिओकाचा 6-3, 6-1, 6-0 असा एकतर्फी धुव्वा उडवित दुसरी फेरी गाठली. राफेल नदालने ऑस्टेलियाच्या जॉर्डन थॉम्पसनवर 6-2, 6-2, 6-2 अशा सरळ सेट्सनी विजय मिळविला. त्याची पुढील लढत फ्रान्सच्या कोरेन्टिन मुटेटशी होईल. हा सामना जिंकल्यास ग्रँडस्लॅममधील नदालचा तो 300 वा विजय असेल. रशियाच्या मेदवेदेव्हने या स्पर्धेची विजयी सुरुवात करताना अर्जेन्टिनाच्या फॅकुन्डो बॅगनिसचा 6-2, 6-2, 6-2 असा फडशा पाडला. गेल्या वर्षी मेदवेदेव्हने या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती. दोन महिन्यांपूर्वी त्याच्यावर हर्नियाची शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर मिळविलेला त्याचा हा पहिलाच विजय आहे. गेल्या आठवडय़ात जिनेव्हा ओपन स्पर्धेत तो पहिल्याच फेरीत पराभूत झाला होता. तो यावर्षी झालेल्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये अंतिम फेरीत पोहोचला होता. पण नदालकडून पराभूत झाल्याने त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.
शॅपोव्हॅलोव्ह, वावरिंका स्पर्धेबाहेर
तीन वेळा ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकणाऱया वावरिंकालाही पहिल्याच फेरीत स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. जागतिक क्रमवारीत 82 व्या स्थानावर असणाऱया कोरेन्टिन मुटेटने त्याला 2-6, 6-3, 7-6 (7-2), 6-3 असे हरविले. 18 महिन्यानंतर प्रथमच त्याने ग्रँडस्लॅममध्ये भाग घेतला होता. सुमारे तीन तास ही लढत रंगली होती. वावरिंकाप्रमाणे कॅनडाच्या 14 व्या मानांकित डेनिस शॅपोव्हॅलोव्हचे आव्हानही पहिल्याच फेरीत संपुष्टात आले. डेन्मार्कच्या 19 वर्षीय होल्गर सुनेने त्याचा 6-3, 6-1, 7-6 (7-4) असा पराभव करीत त्याचा स्वप्नभंग केला.
रॅडुकानू विजयी, कोन्टाव्हेट पराभूत
महिला एकेरीत अमेरिकन ओपन चॅम्पियन ब्रिटनच्या एम्मा रॅडुकानूने झेक प्रजासत्ताकच्या लिंडा नोस्कोव्हावर 6-7 (4-7), 7-5, 6-1 अशी संघर्षपूर्ण मात करीत दुसऱया फेरीत स्थान मिळविले. याच महिन्यात रोममध्ये झालेल्या स्पर्धेत 19 वर्षीय रॅडुकानूने पहिल्या फेरीतून पाठदुखीमुळे माघार घेतली होती. पण येथील लढतीत या दुखापतीचा कोणताही परिणाम तिच्या खेळावर झाला नसल्याचे दिसून आले. तिला येथे 12 वे मानांकन मिळाले आहे. व्हिक्टोरिया अझारेन्का व पेत्र क्विटोव्हा, मार्टिना ट्रेव्हिसन यांनीही विजय मिळवित दुसरी फेरी गाठली. पाचवी मानांकित ऍनेट कोन्टाव्हेटचे आव्हान मात्र पहिल्याच फेरीत समाप्त झाले. तिला ऑस्टेलियाच्या ऍला टोमलानोविकने 7-6 (7-5), 7-5 नमविले. टॉप टेनमधील पहिल्याच फेरीत पराभूत होणारी ती चौथी खेळाडू आहे.