फ्रेंच ग्रँडस्लॅम टेनिस -अझारेन्का चौथ्या फेरीत,स्वायटेक, कोन्टावेट, गॉफ तिसऱया फेरीत, साबालेन्का, मॅडिसन कीज स्पर्धेबाहेर
वृत्तसंस्था/ पॅरिस
विद्यमान विजेत्या राफेल नदालने 35 वा वाढदिवस विजयाने साजरा करीत येथे सुरू असलेल्या पेंच ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या तिसऱया फेरीत स्थान मिळविले. याशिवाय सर्बियाचा नोव्हॅक जोकोविच, स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर, स्पेनचा युवा खेळाडू कार्लोस अल्काराझ, महिलांमध्ये इगा स्वायटेक, ऍनेट कोन्टावेट, पॅव्हल्युचेन्कोव्हा, कोको गॉफ यांनी तिसरी तर व्हिक्टोरिया अझारेन्काने चौथी फेरी गाठली तर ऍरीना साबालेन्का, मॅडिसन कीज यांचे आव्हान संपुष्टात आले.
नदालने फ्रान्सच्या रिचर्ड गॅस्केटवर 6-0, 7-5, 6-2 असा विजय मिळवित तिसऱया फेरीत स्थान मिळविले. 2004 मध्ये या दोघांची पहिल्यांदा गाठ पडली होती. त्यानंतर नदालने 17 व्या सामन्यात गॅस्केटचा पराभव केला आहे. हा सामना नंतर प्रेक्षकाशिवाय खेळविण्यात आला. स्थानिक वेळेनुसार रात्री 9 वाजता नाईट कर्फ्यू सुरू होत असल्याने प्रेक्षकांनी मैदान सोडले होते. एकाच खेळाडूंविरुद्ध 17-0 सामने जिंकणाऱया बियॉन बोर्ग, जोकोविच, फेडरर, इव्हान लेंडल यांच्या पंक्तीत नदालने आता स्थान मिळविले आहे. नदालची पुढील लढत बिगरमानांकित कॅमेरॉन नोरीविरुद्ध होणार आहे. रॉजर फेडररने मारिन सिलिकवर 6-2, 2-6, 7-6 (7-4), 6-2 असा विजय मिळविला. या दोघांत झालेल्या आतापर्यंतच्या 10 लढतीतील फेडररचा हा नववा विजय आहे. ग्रँडस्लॅममध्ये सिलिकवर फेडररने मिळविलेला हा पाचवा विजय आहे. आठवे मानांकन असलेल्या फेडररची पुढील लढत डॉमिनिक कोएफरशी होणार आहे. कोएफरने टेलर फ्रिट्झचा 6-3, 6-2, 3-6, 6-4 असा पराभव केला. बिग थ्रीमधील तिसरा खेळाडू जोकोविचनेही आगेकूच करताना क्लेकोर्ट स्पेशालिस्ट पाब्लो क्युवेसवर 6-3, 6-2, 6-4 असा विजय मिळविला. 19 वे ग्रँडस्लॅम मिळवण्याच्या प्रयत्नात असणाऱया जोकोविचची पुढील लढत लिथुआनियाच्या रिकार्डस बेरान्किसशी होईल. यापूर्वी बेरान्किसविरुद्धच्या तीनही लढती त्यानेच जिंकल्या आहेत.
तिसरी फेरी गाठणारा अल्काराझ सर्वात युवा खेळाडू
अन्य एका लढतीत पात्रता फेरीतून आलेल्या स्पेनच्या 18 वर्षीय कार्लोस अल्काराझने 28 व्या मानांकित निकोलोझ बॅसिश्विलीचा 6-4, 6-2, 6-4 असा पराभव केला. 1992 नंतर या स्पर्धेची तिसरी फेरी गाठणारा तो सर्वात युवा खेळाडू बनला आहे. इटलीचे 19 वर्षीय लॉरेन्झो मुसेटी व यानिक सिनर यांनीही आगेकूच केली आहे. 2001 नंतर पहिल्यांदाच तीन युवा खेळाडूंनी या स्पर्धेची तिसरी फेरी गाठली आहे. 20 वर्षांपूर्वी फेडरर, अँडी रॉडिक व टॉमी रॉब्रेडो यांनी असा पराक्रम केला होता.
स्वायटेक विजयी, साबालेन्का पराभूत
महिला विभागात विद्यमान विजेत्या पोलंडच्या इगा स्वायटेकने तिसऱया फेरीत स्थान मिळविताना रेबेका पीटरसनचा 6-1, 6-1 असा धुव्वा उडविला. आठव्या मानांकित स्वायटेकची पुढील लढत 30 व्या मानांकित ऍना कोन्टावेटशी होणार आहे. 2006 व 07 मध्ये जस्टिन हेनिनने सलग दोनदा ही स्पर्धा जिंकली होती. त्याची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न स्वायटेक या स्पर्धेत करीत आहे. तिसऱया मानांकित साबालेन्काचे आव्हान तिसऱया फेरीतच समाप्त झाले. तिला रशियाच्या 31 व्या मानांकित ऍनास्तेशिया पॅव्हल्युचेन्कोव्हाकडून 4-6, 6-2, 0-6 असा पराभव पत्करावा लागला. पॅव्हल्युचेन्कोव्हाची चौथ्या फेरीची लढत व्हिक्टोरिया अझारेन्काशी होणार आहे. अझारेन्काने 2013 नंतर प्रथमच या स्पर्धेची चौथी फेरी गाठली असून तिने अमेरिकेच्या मॅडिसन कीजचे आव्हान 6-2, 6-2 असे संपुष्टात आणले. आठ वर्षापूर्वी अझारेन्काने या स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. अमेरिकेच्या कोको गॉफने पहिल्यांदाच या स्पर्धेची तिसरी फेरी गाठली असून तिने चीनच्या वांग कियांगचा 6-3, 7-6 (7-1) असा पराभव केला. तिची पुढील लढत जेनिफर ब्रॅडी किंवा फिओना फेरो यापैकी एकीशी होईल.
रशियाची याना सिझिकोव्हा मॅचफिक्सिंग प्रकरणी पोलिसांच्या ताब्यात
गेल्या वर्षी प्रेंच ओपन स्पर्धेत महिला दुहेरीचा सामना फिक्स केल्याच्या संशयावरून पॅरिस पोलिसांनी रशियाच्या याना सिझिकोव्हाला ताब्यात घेतले असल्याचे पोलिसांनी सांगितले. 26 वर्षीय सिझिकोव्हा महिला दुहेरीच्या क्रमवारीत सध्या 101 व्या स्थानावर असून या वर्षीच्या सामन्यात भाग घेतल्यानंतर तिला गुरुवारी रात्री पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे पॅरिस प्रॉसिक्युटर्सच्या कार्यालयातील सूत्राने सांगितले.
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये झालेल्या या स्पर्धेतील पहिल्या फेरीच्या सामन्यात सिझिकोव्हा व तिची अमेरिकन साथीदार मॅडिसन ब्रेन्गल यांना रोमानियाच्या आंद्रीया मिटू व पॅट्रिसिया मारिया टिग यांच्याकडून हार पत्करावी लागली होती. या सामन्यात भ्रष्टाचार व फसवणूक झाल्याच्या संशयावरून त्याचा तपास करण्यात येत आहे. फ्रान्सबाहेरच्या देशात या सामन्याच्या बेटिंगमध्ये अनपेक्षित वाढ झाल्याने ते कायदा संचलनालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले होते, असेही या माहितगार सूत्राने सांगितले. त्या सामन्यातील दुसऱया सेटमधील पाचव्या गेमबाबत सर्वाधिक संशय असून सिझिकोव्हाने दोनदा हेतुपूर्वक डबल फॉल्ट केल्याचे तपासकर्त्यांना त्याचे विश्लेषण केल्यानंतर आढळून आले. गुरुवारी झालेल्या सामन्यात सिझिकोव्हा व तिची नवीन साथीदार एकतेरिना अलेक्झांड्रोव्हा यांना ऑस्ट्रेलियाच्या स्टॉर्म सँडर्स व ऍला टोमलानोविक यांच्याकडून पहिल्याच फेरीत पराभव स्वीकारावा लागला.