ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस : अलेक्झांडर व्हेरेव्ह, थिएम, हॅलेप, मुगुरुझा पहिल्यांदाच उपांत्य फेरीत
वृत्तसंस्था/ मेलबर्न
जर्मनीचा युवा खेळाडू अलेक्झांडर व्हेरेव्हने ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेत पहिल्यांदाच उपांत्य फेरीत प्रवेश मिळविताना स्वित्झर्लंडच्या स्टॅनिसलास वावरिंकाचे आव्हान संपुष्टात आणले तर ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थिएमने सर्वात धक्कादायक निकाल देताना स्पेनच्या राफेल नदालला चकित करून शेवटच्या चारमध्ये स्थान मिळविले. महिला एकेरीत सिमोना हॅलेप व गार्बिन मुगुरुझा यांनीही उपांत्य फेरी गाठली आहे.
सातव्या मानांकित व्हेरेव्हला पहिल्या सेटमध्ये माजी विजेत्या वावरिंकाने एकतर्फी हरविले. पण नंतरचे सलग तीन सेट्स जिंकून आगेकूच केली. व्हेरेव्हने वावरिंकावर 1-6, 6-3, 6-4, 6-2 अशी मात केली. त्याची उपांत्य लढत पाचव्या मानांकित डॉमिनिक थिएमशी होणार आहे. 19 व्या प्रयत्नात त्याला ग्रँडस्लॅमची उपांत्य फेरी गाठण्यात यश आले आहे. त्याने या सामन्यात पॉवरफुल सर्व्हिसच्या बळावर 13 बिनतोड सर्व्हिस केल्या तर फक्त एकच दुहेरी चूक केली. व्हेरेव्हने या स्पर्धेत मिळविलेल्या प्रत्येक विजयासाठी ऑस्ट्रेलियातील भीषण वणव्यात बळी गेलेल्यांच्या मदतीसाठी 10,000 डॉलर्स देण्याचे घोषित केले आहे. जर त्याने ही स्पर्धा जिंकली तर कदाचित जेतेपदाचे 4.12 दशलक्ष डॉलर्सची (2.78 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स) रक्कम मदत म्हणून देण्याचीही शक्यता आहे. ‘इथवर मजल मारल्यानंतर एक वेगळीच भावना मनात आहे. इतर स्पर्धांत मी अनेकदा चांगली कामगिरी केलेली आहे. पण ग्रँडस्लॅममध्ये मला मर्यादा ओलांडता आली नव्हती. त्यामुळे आता माझ्या काय भावना आहेत, हे शब्दांत सांगता येणार नाही. भविष्यातील यशाची ही सुरुवात असेल, अशी मी आशा करतो,’ अशा भावना व्हेरेव्हने सामन्यानंतर व्यक्त केल्या. वावरिंकाने 2014 मध्ये ही स्पर्धा जिंकली होती.
नदाल थिएमककडून चकित
पाचव्या मानांकित थिएम सहा वर्षांपासून ग्रँडस्लॅममध्ये स्पेनच्या राफेल नदालकडून निराश झाला होता. पण यावेळी त्याने ही निराशा दूर करताना नदालला चुरशीच्या लढतीत 7-6 (7-3), 7-6 (7-4), 4-6, 7-6 (8-6) अशी मात केली. या स्पर्धेत पहिल्यांदाच त्याने उपांत्य फेरी गाठली आहे. शुक्रवारी थिएम व व्हेरेव्ह यांच्यात अंतिम फेरी गाठण्यासाठी लढत होणार आहे.
मुगुरुझा, हॅलेप शेवटच्या चारमध्ये
महिला एकेरीत स्पेनच्या बिगरमानांकित 26 वर्षीय मुगुरुझाने रशियाच्या ऍनास्तेशिया पॅव्हल्युचेन्कोव्हाचा 7-5, 6-3 असा पराभव केला. या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठण्याची तिचीदेखील पहिलीच वेळ आहे. उपांत्य फेरीत तिचा मुकाबला दोन वेळची ग्रँडस्लॅम चॅम्पियन सिमोना हॅलेपशी होणार आहे. पॅव्हल्युचेन्कोव्हो 2006 व 2007 मध्ये या स्पर्धेत कनिष्ठ मुलींच्या गटाचे जेतेपद मिळविले होते. हॅलेपने केवळ 53 मिनिटांत इस्टोनियाच्या ऍनेट कोन्टावेटचा 6-1ण् 6-1 असा धुव्वा उडविला. रोमानियाच्या 28 वर्षीय हॅलेपने 2018 मध्ये प्रेंच ओपन व गेल्या वर्षी विम्बल्डन स्पर्धेचे जेतेपद मिळविले होते. त्यात आता ऑस्ट्रेलियन ओपनच्या जेतेपदाची भर घालण्याची तिला संधी मिळाली आहे. 2018 मध्ये तिला या स्पर्धेच्या अंतिम फेरीत कॅरोलिन वोझ्नियाकीकडून पराभव स्वीकारावा लागला होता.
सुरक्षा रक्षकाकडून नदालची अडवणूक
जागतिक अग्रमानांकित राफेल नदालला बुधवारी कडक सुरक्षा व्यवस्थेची पहिल्यांदाच चव चाखायला मिळाली. सामन्यासाठी कोर्टवर जाण्याआधी चेकपॉईंटवर त्याला सुरक्षा रक्षकाने थांबवले आणि त्याच्याकडे ओळखपत्राची मागणी केली. बाहेर ट्रेनिंग घेत असल्याने पास आणला नसल्याचे नदालने स्पष्ट केले. पण दुसरा सुर
क्षा रक्षक आल्यावर त्याने नदाल एक महान टेनिसपटू असल्याचे सांगितल्यानंतर त्याने त्याला मेलबर्न पार्कच्या हॉलमध्ये जाऊ दिले. 2019 मध्ये रॉजर फेडररलाही असाच अनुभव आला होता. त्यावेळी त्याला लॉकररूममध्ये जाण्यापासून रोखण्यात आले होते.