वृत्तसंस्था/ पॅरीस
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या पॅरीस मास्टर्स पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत स्पेनचा माजी टॉप सीडेड राफेल नदाल, जर्मनीचा ऍलेक्झांडर व्हेरेव्ह आणि कॅनडाचा मिलोस रेओनिक यांनी एकेरीची उपांत्य फेरी गाठली आहे.
या स्पर्धेतील झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात राफेल नदालने आपल्याच देशाच्या बुस्टाचा 4-6, 7-5, 6-1 असा पराभव करत उपांत्य फेरीत स्थान मिळविले आहे. नदाल आणि व्हेरेव्ह यांच्यात उपांत्य सामना होणार आहे. चालू महिन्याच्या अखेरीस लंडनमध्ये होणाऱया एटीपी टूरवरील अंतिम स्पर्धेत स्थान मिळविण्याचे बुस्टाचे आव्हान या पराभवामुळे संपुष्टात आले आहे. नदालने एटीपी टूरवरील 1000 वा सामना जिंकण्याचा पराक्रम या स्पर्धेत यापूर्वी केला आहे.
दुसऱया उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात जर्मनीच्या व्हेरेव्हने स्वीसच्या वावरिंकाचा 6-3, 7-6, (7-1) असा पराभव करत शेवटच्या चार खेळाडूंत स्थान मिळविले. रशियाच्या मेदव्हेदेवने अर्जेंटिनाच्या शुवार्त्झमनचे आव्हान 6-3, 6-1 असे संपुष्टात आणत उपांत्य फेरी गाठली. कॅनडाच्या मिलोस रेओनिकने फ्रान्सच्या हंबर्टचा 6-3, 3-6, 7-6 (9-7) असा पराभव करत शेवटच्या चार खेळाडूंत स्थान मिळविले. रेओनिक आणि मेदव्हेदेव यांच्यात उपांत्य फेरीचा सामना होईल.