ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस : विद्यमान विजेती केनिन, गॉफ यांना पराभवाचा धक्का, बार्टी, स्विटोलिनाची आगेकूच
वृत्तसंस्था / मेलबर्न
स्पेनचा राफेल नदाल, जागतिक सहावा मानांकिन स्टेफानोस सित्सिपस, ऑस्ट्रेलियाची अग्रमानांकित ऍश्ले बार्टी, माजी अग्रमानांकित कॅरोलिना प्लिस्कोव्हा, काया कॅनेपी, स्विटोलिना यांनी ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेच्या तिसऱया फेरीत प्रवेश मिळविला. विद्यमान विजेत्या अमेरिकेच्या सोफिया केनिनला तसेच कोको गॉफला मात्र दुसऱया फेरीतच पराभवाचा धक्का बसला. तसेच भारताच्या अंकिता रैना व दिविज शरण यांचे दुहेरीतील आव्हानही संपुष्टात आले.
नदालच्या फिटनेसबाबत शंका व्यक्त करण्यात येत होत्या. पण त्याने अमेरिकेच्या पात्रता फेरीतून आलेल्या मायकेल मीमोहवर 6-1, 6-4, 6-2 असा सहज विजय मिळविला तेव्हा तो पूर्ण तंदुरुस्त असल्याचे स्पष्ट झाले. हा विजय मिळवित 21 वे ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या मार्गावर त्याने आणखी एक पाऊल टाकले आहे. गेल्या आठवडय़ात एटीपी चषक सांघिक स्पर्धा झाली. त्यात स्पेनतर्फे त्याने एकाही सामन्यात पाठदुखीच्या समस्येमुळे भाग घेतला नव्हता. त्यानंतर या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यानंतरही त्याने पाठदुखीची अजूनही काळजी वाटत असल्याचे म्हटले होते. 2009 मध्ये त्याने ही स्पर्धा जिंकली होती. त्याची रॉजर फेडररइतकीच 20 ग्रँडस्लॅम अजिंक्यपदे झाली आहेत. त्याची पुढील लढत ब्रिटनचा कॅमेरॉन नोरी किंवा रशियाचा रोमन सफिउल्लिन यापैकी एकाशी होणार आहे.
ग्रीकच्या सहाव्या मानांकित सित्सिपसने तिसरी फेरी गाठली असली तरी त्याला विजयासाठी पाच सेट्सपर्यंत संघर्ष करावा लागला. वाईल्डकार्ड प्रवेश मिळालेल्या ऑस्ट्रेलियाच्या थानासी कोकिनाकिसवर त्याने 6-7 (5-7), 6-1, 6-1, 6-7 (5-7), 6-4 अशी मात केली. सुमारे साडेचार तास ही झुंज रंगली होती. स्वीडनच्या मायकेल वायमरशी त्याची पुढील लढत होणार आहे. वायमरने स्पेनचा युवा खेळाडू कार्लोस अलकाराजचा 2-6, 6-4, 6-4, 7-6 (7-5) असा पराभव केला.
केनिन पराभूत
महिला एकेरीत विद्यमान विजेत्या सोफिया केनिनला जेतेपद स्वतःकडेच राखण्याच्या दडपणाला व्यवस्थित हाताळता आले नाही. तिला दुसऱया फेरीत इस्टोनियाच्या काया कॅनेपीकडून 6-3, 6-2 असे केवळ 64 मिनिटांत पराभूत झाल्यानंतर तिला अश्रू आवरता आले नाहीत. जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असणारी केनिन विद्यमान विजेती आहे. मात्र तिला यावेळी तिसरी फेरीही गाठता आली नाही. अशी कामगिरी करणारी ती 1970 नंतरची पहिली टेनिसपटू आहे. 2003 मध्ये या स्पर्धेच्या विद्यमान विजेत्या असणाऱया जेनिफर कॅप्रियतीला नंतर पहिल्याच फेरीत स्पर्धेबाहेर पडावे लागले होते. यावेळी केनिनला मात्र दुसऱया फेरीत पराभव स्वीकारावा लागला.
पहिल्या दोन फेऱयांत काही मानांकित खेळाडू स्पर्धेबाहेर पडल्या असून त्यात बियान्का अँड्रेस्क्यू, पेत्रा क्विटोव्हा यांचा समावेश आहे. गेल्या आठवडय़ातही केनिनला यारा व्हॅली क्लासिक स्पर्धेत स्पेनच्या गार्बिन मुगुरुझाकडून हार पत्करावी लागली होती.
कॅनेपी मात्र चांगल्या फॉर्ममध्ये असून तिने मागील आठवडय़ात गिप्सलँड ट्रॉफी स्पर्धेत उपविजेतेपद मिळविले होते. तिची पुढील लढत 28 व्या मानांकित क्रोएशियाच्या डोना व्हेकिकशी होणार आहे.
अमेरिकेची युवा सेन्सेशन असणाऱया कोको गॉफलाही दुसऱया फेरीतच स्पर्धेबाहेर पडावे लागले. युक्रेनच्या पाचव्या मानांकित एलिना स्विटोलिनाने अनुभवाच्या जोरावर गॉफवर 6-4, 6-3 अशी सव्वातासाच्या खेळात मात केली. अन्य एका सामन्यात सहाव्या मानांकित कॅरोलिना प्लिस्कोव्हाने डॅनियली कॉलिन्सचा 7-5, 6-2 असा पराभव करून तिसरी फेरी गाठली. कॉलिन्सने 2019 मध्ये या स्पर्धेच्या उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. कॉलिन्सने गेल्याच आठवडय़ात यारा क्लासिक स्पर्धेत प्लिस्कोव्हाला हरवून जेतेपद पटकावले होते. झेकची प्लिस्कोव्हा पहिले ग्रँडस्लॅम जेतेपद मिळविण्याच्या प्रयत्नात असून तिची पुढील लढत तिचीच मैत्रिण कॅरोलिना मुचोव्हाशी होणार आहे.
ऑस्ट्रेलियाच्या बार्टीने आपल्याच देशाच्या दारिया गॅव्हरिलोव्हाचा 6-1, 7-6 (9-7) असा पराभव करीत आगेकूच केली. सुमारे दीड तास ही लढत रंगली होती. बार्टीने यावेळी मांडीला स्टॅपिंग केले होते. त्यामुळे ती दुखापत घेऊन खेळत आहे, असे बोलले जात होते. पण तिने ती शक्यता फेटाळून लावली. तिची पुढील लढत रशियाच्या 29 व्या मानांकित एकतेरिना अलेक्झांड्रोव्हाशी होणार आहे. एकतेरिनाने झेकच्या बार्बरा क्रेसिकोव्हाला हरवून आगेकूच केली आहे.
अंकिता रैना, दिविज शरणचे आव्हान समाप्त
भारताचा दिविज शरण तसेच अंकिता रैना या दोघांचेही पुरुष व महिला दुहेरीतील आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले. मुख्य ड्रॉमध्ये स्थान मिळविणारी तिसरी भारतीय बनलेली अंकिता रोमानियाच्या मिहीला बुझारनेस्क्यूसमवेत खेळत होती. या जोडीला ऑस्ट्रेलियाच्या ऑलिव्हिया गॅडेकी व बेलिंडा वूलकूक यांच्याकडून 6-3, 6-0 असा सव्वा तासात पराभव स्वीकारावा लागला. पुरुष दुहेरीत दिविज शरण व स्लोव्हाकियाचा इगोर झेलेनी यांना जर्मनीच्या यानिक हन्फमन व केविन क्रॅवीट्झ यांच्याकडून 6-1, 6-4 असे पराभूत व्हावे लागले. याआधी बुधवारी रोहन बोपण्णालाही पुरुष दुहेरीत हार पत्करावी लागली होती. मिश्र दुहेरीत भरपाई करण्याची बोपण्णाला संधी असून तो या स्पर्धेत चीनच्या यिंगयिंग डुआनसमवेत खेळत आहे. त्यांची सलामीची लढत बेथनी मॅटेक सँड्स-जेमी मरे यांच्याशी होणार आहे.