कराड / प्रतिनिधी :
कराड तालुक्यातील मालखेड येथे मारूती घाट परिसरातील नदीपात्रात पुरूष जातीचा मृतदेह बुधवारी दुपारी आढळला. दोन ते तीन पोत्यात बांधून मृतदेह नदीत टाकला असा संशय व्यक्त करण्यात आला असून, मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम पोलिसांकडून सुरू होते. दरम्यान या घटनेमुळे खऴबळ उडाली आहे. हा घातपात असण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून त्या दृष्टीने पोलिसांच्या तपासाची चक्रे गतिमान झाली आहेत.
कराड तालुक्यातील मालखेड येथे बुधवारी काही मासेमारी करणारे नदीपात्रात होते. त्यावेळी त्यांना एक पोते नदीपात्रात आढळले.संशय आल्याने त्यांनी तत्काळ पोलिसांना फोन केला. अपर पोलीस अधिक्षक अजित बोराडे, उपअधिक्षक रणजीत पाटील, सहाय्यक निरिक्षक रेखा दुधभाते, भरत पाटील, एसआय जाधव, धनंजय कोळी, सज्जन जगताप, विजय म्हेत्रे, शशिकांत घाडगे यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली असता तो पुर्णतः कुजलेल्या अवस्थेत होता. कपड्यासह इतर काही बाबींवरून मृृतदेहाची ओळख पटवण्याचे काम वेगाने सुरू होते. हा मृत्यू संशयास्पद असून घातपाताची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सर्व शक्यता गृहीत धरून पोलिसांचा तपास सुरू झाला आहे.