वार्ताहर/ मार्गताम्हाने
नदीत पोहायला गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना चिपळूण तालुक्यातील वाघिवरे मोहल्ला येथे घडली. याबाबतची फिर्याद पोलीस पाटील अनिल जाधव यांनी रामपूर पोलीस दूरक्षेत्रात सोमवारी संध्याकाळी दिली.
उमर यासिन मुकादम (17) व दाऊद अब्दुला साबळे (15) अशी मृत अल्पवयीन मुलांची नावे आहेत. ते दोघे व त्यांचे अन्य दोन मित्र असे चौघेजण घरामध्ये कुणालाही न सांगता सोमवारी दुपारी 3 च्या सुमारास मोहल्ल्यानजीकच्या रुमाणे बंदरालगत असणाऱया धावली नदीच्या डोहात पोहण्यासाठी गेले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले महिनाभर लॉकडाऊन असल्याने ते घरात बसून कंटाळले होते.
मुळातच ही मुले आजतागायत कधीही नदीवर किंवा खाडीत पोहायला गेली नव्हती. रूमाणे बंदरानजीक धावली नदीचा प्रवाह वेगवान असल्यची व डोह खोल असल्याबाबतची पुसटशी कल्पनाही त्यांना नव्हती. या चौघां मुलांपैकी दोन मुलांनी नदीच्या काठावरच उभे राहणे पसंत केले, तर उमर मुकादम व दाऊद साबळे हे दोघे नदीत पोहायला उतरली. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले. दोघेजण बुडत असल्याचे पाहुन काठावर उभार असलेला एकजण त्यांना वाचवण्यासाठी नदीत उतरला. मात्र, त्याला या घटनेची गंभीरता लक्षात आल्यावर तो मागे वळला.
त्यानंतर या दोन मुलांनी मोहल्ल्याकडे धाव घेत या घटनेची माहिती दिली. घटनास्थळी एकच गर्दी झाली होती. या दोन मुलांना डोहातून बाहेर काढण्यात आले. मात्र दोघांचाही मृत्यू झाला होता. या घटनेची खबर वाघिवरे पोलीस पाटील अनिल जाधव यांनी चिपळूण पोलीस स्थानकात दिली. यानुसार ए.एस.आय. नामदेव जाधव व लालजी यादव घटनास्थळी दाखल झाले. या दोन्ही मुलांचे मृतदेह ताब्यात घेऊन ते उत्तरीय तपासणीसाठी सायंकाळी उशिरा कामथे उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.
दुसऱयांना मदत करणारी मुले
उमर व दाऊद या मुलांनी नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती. सहसा ही मुले घरातून बाहेर पडत नसत. लॉकडाऊन कालावधीतही ही मुले आपल्या घरातच होती. ती नेहमीच इतरांच्या उपयोगी पडणारी होती. एखाद्याने कोणतेही लहान-सहान काम सांगितले तरी चटकन करायची. यातील दाऊदचे वडील कामगार आहेत. या मुलांच्या दुर्दैवी मृत्यूने वाघिवरेवासियांनी हळहळ व्यक्त केली आहे.