रायबंदर-चोडण मार्गावर फेरीबोटीचे मुख्यमंत्र्यांहस्ते उद्घाटन
प्रतिनिधी / पणजी
नदी परिवहन खात्याने सुमारे रु. 1.85 कोटी खर्च करून तीन नवीन फेरीबोटी खरेदी केल्या असून त्यातील एका फेरीबोटीचे उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. ती नवीन फेरीबोट रायबंदर-चोडण या मार्गावर सुरू करण्यात आली असून इतर दोन फेरीबोटी दुसऱया मार्गावर चालू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
नदी परिवहन खात्याचे मंत्री मिलिंद नाईक, कॅप्टन ऑफ पोर्टचे (बंदर कप्तान) अधिकारीवर्ग यावेळी उपस्थित होता. डॉ. सावंत यांनी फित कापून नवीन फेरीबोट जनतेच्या सेवेसाठी खुली केली. कोरोनाचे सावट भय असले व लॉकडाऊन सुरू असले तरी जनतेच्या सोयी-सुविधेसाठी सरकारची कामे चालूच आहेत. सध्याचा काळ कठीण आहे व आर्थिक परिस्थिती बिकट असतानाही सरकारने विविधकामे चालूच ठेवली आहेत, अशी माहिती डॉ. सावंत यांनी दिली. या नव्या फेरीबोटींची जनतेला गरज होती व सरकारने तोटा-नुकसान सोसूनही फेरीबोट सेवा चालू ठेवली असल्याचे डॉ. सावंत म्हणाले.