निफ्टी मात्र सावरला : कोटक बँकेचे समभाग सर्वाधिक मजबूत
वृत्तसंस्था / मुंबई
चालू आठवडय़ातील दुसऱया सत्रात बुधवारी नफा कमाईच्या कारणामुळे सेन्सेक्सची घसरण झाली आहे. सोमवारच्या विश्रांतीनंतर बाजाराने विदेशी गुंतवणुकीच्या मजबूत कामगिरीने मोठी उसळी घेत मंगळवारी नव्या विक्रमाची नोंद केल्याचे पहावयास मिळाले होते. परंतु सदरची स्थिती कायम टिकवण्यात बुधवारी शेअर बाजाराला अपयश आले असून सेन्सेक्स दिवसअखेर 37 अंकांची घसरण नोंदवत बंद झाला आहे.
नव्या उच्चांकानंतर बीएसई सेन्सेक्सच्या निर्देशांकात बुधवारच्या सत्रात घसरण झाली आहे. बँका आणि काही कंपन्यांच्या समभागांच्या नफा कमाईमुळे तसेच गुंतवणूकदारांच्या सावध भूमिकेमुळे सेन्सेक्सचा निर्देशांक दिवसअखेर 37.40 अंकांनी घसरुन 44,618.04 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 4.70 अंकांनी सावरुन हलकी तेजी प्राप्त करत दिवसअखेर निफ्टी 13,113.75 वर स्थिरावला आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेकडून पतधोरणासंदर्भात बैठक सुरू असून सध्या बँकांच्या समभागात नफा कमाईचे वातावरण पहावयास मिळत आहे. याचा नकारात्मक परिणाम म्हणून बुधवारच्या सत्रात कोटक बँकेचे समभाग सर्वाधिक 3.28 टक्क्यांनी घसरले आहेत. सोबत एचडीएफसी बँक 1.86, एचडीएफसी 1.28, आयसीआयसीआय बँक 0.99, भारतीय स्टेट बँक 0.5, बजाज फायनान्सचे समभाग 0.72 आणि लार्सन ऍण्ड टुब्रोचे समभाग 0.16 टक्क्यांनी घसरुन बंद झाल्याची नोंद आहे.
अन्य घडामोडींचा प्रभाव
अमेरिकन प्रोत्साहन पॅकेजसंबंधीत सतर्कता आणि फायझरच्या कोविड19 लसीला ब्रिटनमध्ये लसीकरणास मिळालेल्या मंजुरीमुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण राहिले होते. याचा प्रभाव म्हणून प्रमुख कंपन्यांपैकी ओएनजीसीचे समभाग 4.11, एशियन पेन्ट्स 3.74 आणि टायटनचे समभाग 3.84 टक्क्यांनी मजबूत स्थितीत राहिले होते.
याचदरम्यान वाहन कंपन्यांची नोव्हेंबरमधील उत्साहवर्धक विक्रीच्या आकडेवारीचा लाभ वाहन कंपन्यांना सकारात्मक स्वरुपात झाल्याचे तज्ञांनी म्हटले आहे.