मानव पृथ्वीवर जन्म घेताना हातात काहीच घेऊन येत नसतो. मात्र जन्मल्यानंतर प्रत्येक माणूस आपले कर्तृत्व आणि व्यक्तीमत्व घडवत असतो. काहीजण प्रसिध्द होतात वाईट कारणांसाठी तर काहीजणांचा अटकेपार झेंडा त्यांना सर्वत्र प्रसिध्द करीत असतो. जनमानसात आपले कार्य वाढल्यानंतर आपल्या नावाची ख्याती आपल्या साधेपणा, नम्रता, सुस्वभावाने सदैव राखू शकणारा नेता हाच सदैव लोकमान्यता प्राप्त झालेला नेता असतो. आणि त्याच नेत्याला लोकांच्या मनावर राज्य करण्याचा खरा अधिकार असतो, हेच आतापर्यंत दाखवून दिले आहे डिचोलीचे आमदार तथा गोवा राज्य विधानसभेचे सभापती राजेश पाटणेकर यांनी. राजेश पाटणेकर यांचा जिवनप्रवास म्हणजे “एक नम्र व सुस्वभावी व्यक्तीमत्व आणि अजातशत्रू आमदार” असाच आहे. आज त्यांच्या वाढदिनी त्यांच्या राजकीय प्रवासावर प्रकाश टाकणारा हा लेख..
राजकारणात सदैव लोकांबरोबर चांगले वागणे, त्यांच्या समस्या समजून घेत त्यांची कामे करून देणे व प्रत्येकाशी आपले असलेले संबंध उत्तमरीत्या राखणे. आमदार राजेश पाटणेकर यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला डिचोली नगरपालिकेतून सुरूवात केली. सर्वप्रथम नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या या नेत्याने आपल्या प्रभागाबरोबरच नगरपालिकेच्या माध्यमातून संपूर्ण नगरपालिका क्षेत्रात आपली छाप उमटवली. याच त्यांच्या कार्यातून व लोकप्रियतेतून त्यांना 1999 साली भाजपने विधानसभेची उमेदवारी दिली. मात्र त्याचा विजय केवळ 89 मतांनी हुकला. मगोचे पांडुरंग राऊत हे आमदार बनले. मात्र आपल्या कामाची धार कमी हाऊ न दिलेल्या राजेश पाटणेकर यांनी 2002 च्या निवडणुकीत जबरदस्त कमबॅक करताना विजय संपादन केला. आणि भाजपने डिचोलीत राजेश पाटणेकर यांच्याच स्वरूपात खाते खोलले. त्यानंतर 2007 च्या निवडणुकीतही भाजपतर्फे राजेश पाटणेकर यांनी पुन्हा विजय संपादन करीत पुन्हा आपले वर्चस्व या मतदारसंघावर प्रस्थापित केले.
मात्र 2012 च्या निवडणुकीला सहा महिने शिल्लक असताना पाटणेकर यांनी भाजपची साथ सोडली. आमदारकीचा राजिनामा देत त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. आणि त्या निर्णयाची त्याना शिक्षा भोगावी लागली. 2012 च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षातर्फे निवडणूक रिंगणात उतरलेल्या पाटणेकरांना हखर पत्करावी लागली. ती चूक सुधारत त्यांनी 2017 च्या निवडणुकीपूर्वी 1015 च्या नगरपालिका निवडणुकीदरम्यान पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला. आणि भाजपने त्यांच्यावर विश्वास दाखविताना त्यांना उमेदवारीही बहाल केली. भाजपचा विश्वास सार्थ ठरवत पुन्हा राजेश पाटणेकर यांनी डिचोली मतदारसंघात कमबॅक करीत विजयश्री खेचून आणली. आपली चूक सुधारत त्यांनी भाजपलाही या मतदारसंघात मानाची जागा प्राप्त करून दिली. विरोधात वातावरण असतानाही त्यांनी प्रवाहाच्या विरूद्ध झेप घेत विजय प्राप्त केला. या विजयाने पाटणेकर यांची लोकप्रियता पुन्हा सिध्द झाली.
या इतक्मया राजकारणात आपल्या हातून 2012 साली घडलेल्या चुकीची मात्र ते स्वतःच्या तोंडातून अनेकवेळा उल्लेख करतात. त्यावर पश्चातापही करतात. राजकारणात भूतकाळात घडलेल्या गोष्टींना तितके महत्त्व दिले जात नाही. केवळ वर्तमान आणि भविष्यकाळाचाच विचार अधिक असतो. मात्र ज्या ज्या वेळी पाटणेकर यांना संधी मिळते त्या त्या वेळी ते आपल्या चुकीचा उल्लेख करतातच आणि आजच्या यशाबध्दल समाधानही व्यक्त करतात. आज आपण आमदार झालो असलो म्हणून मागील गोष्टी विसरून पुढे न जाता या कठीण समयी आपल्याला साथ दिलेल्या मतदार व इतर सर्वांप्रती ते कृतज्ञता व्यक्त करतातच.
आमदार राजेश पाटणेकर हे डिचोली मतदारसंघाला लाभलेले एक नम्र, सुस्वभावी, सदैव हसतमुख असेच व्यक्तीमत्व असून कोणीही काहीही आपल्याबध्दल वाईट बोलले तरी आपला संयम ढळू न देता प्रत्येक परिस्थितीला समर्थपणे सामोरे जाण्याचा त्यांचा स्वभाव आज त्यांच्यासाठी राजकारणात लाभदायक ठरला आहे. पाटणेकर हे एक चांगले व्यक्ती असल्याने आम्ही त्यांच्यासोबत असल्याचे अनेकजण सांगतात. गेल्या निवडणुकीत त्यांच्या नावाचा मोठा बोलबालाही नसताना त्यांनी प्रवाहाच्या विरूद्ध दिशेने जात मिळविलेले यश हे अनपेक्षित आणि दैदिप्यमान असेच होते. केवळ त्यांचा सुस्वभाव आणि नम्रपणा हिच कारणे त्यांच्या यशासाठी महत्वपूर्ण ठरली.
राजकारणात असताना आपल्या कार्यकर्त्यांची कामे सर्वप्रथम करायची आणि इतरांकडे दुर्लक्ष करायचे, हा बाणा कधी त्यांधी आपल्या अंगी बाळगलाच नाही. उलट आपल्याकडे येणाऱया प्रत्येकाचे काम करून करण्याची जबाबदारी ते स्विकारतात आणि करतातही. याच त्यांच्या स्वभावामुळे त्यांना अजातशत्रू असेही संबोधले जाते. हजारो लोकांच्या मनावर राज्य करताना या गोष्टींचा गर्व त्यांनी कधी बाळगलाच नाही. मनी केवळ साधेपणाच बाळगणाऱया पाटणेकरांनी कधीच गर्व बाळगला नाही. आज सभापती असतानाही डिचोली मतदारसंघात तसेच बाहेरही सभापतींच्या तोऱयात न फिरता एक सामान्य माणूस याप्रमाणेच फिरताना त्यांच्यातील साधेपणा आणि निगर्वी स्वभावाची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही.
2002 च्या विधानसभा निवडणुकीत विजयी ठरल्यानंतर त्यांना अत्यंत कमीच दिवसांसाठी सत्ता मिळाली. त्यानंतर राज्यात काँग्रेस सरकार स्थापन झाले. 2007 च्या निवडणुकीतही ते विजयी ठरले खरे, पण राज्यात त्याहीवेळी काँग्रेस सरकारच स्थापन झाले. मात्र एक चांगला माणूस आणि अंगातच सर्वांशी सलोख्याने वागण्याची सवय असलेल्या पाटणेकर यांनी विरोधी आमदार असतानाही अनेक कामे केली. विकासप्रकल्प विरोधी पक्षातील असल्याने रखडायचे, मात्र त्यांनी आपल्या चांगल्या स्वभावातून अनेकांना सरकारी रोजगारही प्राप्त करून दिले. त्यानंतर 2012 च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला असला तरी त्यांनी डिचोली मतदारसंघातील लोकांशी असलेली आपल्या नात्यातील धार कमी होऊ दिली नाही. याचकाळात मध्यंतरी त्यांच्या आरोग्याची समस्या निर्माण झाली. त्यामुळे बराच काळ त्यांना घरातच आराम करावा लागला. मात्र त्यावर मात करीत त्यांनी मतदारसंघात पुन्हा झेप घेण्यास प्रारंभ केला आणि सर्वप्रथम भाजपचा विश्वास संपादन करीत उमेदवारी मिळवली आणि त्याच जोमाने आमदारकीही हस्तगत केली.
विद्यमान कार्यकाळात म्हणजेच 2017 नंतर राज्यात भाजपचेच सरकार स्थापन झाले. आणि सर्वप्रथम त्यांना हस्तकला महामंडळाची जबाबदारी देण्यात आली. तत्कालीन मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रिकर यांच्या नेतृत्वाखाली सरकारात पाटणेकर यांना मंत्रीपद मिळावे अशी अनेकांना अपेक्षा होती. डिचोली मतदारसंघातील जनता तर त्यासाठी प्रतिक्षाच करीत होती. मात्र तसे झाले नाही. मनोहर पर्रिकर आजारी झाल्यानंतर त्यांची भेट घेण्यासाठी गेलेल्या पाटणेकर यांनी “योग्य ते पद देणार” असे आश्वासन दिले होते. पर्रीकर यांच्या निधनानंतर मुख्यमंत्रीपद तत्कालीन सभापती डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे सोपविण्यात आले, तर राजेश पाटणेकर यांच्याकडे सभापतीपद आले. आणि डिचोलीला राज्यातील एक महत्वाचे पद बऱयाच काळानंतर सरकारात प्राप्त झाले. 2017 नंतर राज्यात भाजपचे सरकार आणि डिचोलीत राजेश पाटणेकर यांच्या स्वरूपात भाजपचाच आमदार असल्याने डिचोलीच्या विकासाला चगलीच गती प्राप्त झाली होती. पाटणेकर यांच्या नेतृत्वाखाली अनेक विकास प्रकल्पांना प्रारंभही झाला. आज ते सभापती असल्याने डिचोली मतदारसंघाच्या चौफेर विकासाला चांगलीच चालना मिळाली आहे. अनेक रखडून पडलेल्या प्रकल्पांची कामे सुरू झाली असून अनेक प्रकल्प पुर्णत्वाकडे पोहोचले आहेत. डिचोली शहराचा चौफेर साधनसुविधा विकास आज सभापती राजेश पाटणेकर यांच्या नेतृत्वाखाली पहायला मिळत आहे. डिचोलीचा विकास हा आपणास “प्रोजेक्ट पे प्रोजेक्ट” अशा पध्दतीने करायचा असल्याचे त्यांचे विधान ते खरे ठरवितानाच दिसत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून विकासाला आसुसलेल्या डिचोली मतदारसंघावर आता कुठेतरी विकासाची नवीन झालर पहायला मिळत आहे. ती केवळ सभापती आणि आमदार राजेश पाटणेकर यांच्यामुळे.