नरंदे/वार्ताहर
गर्दीने खचाखच भरलेल्या मैदानात सव्वा लाखाच्या कुस्तीचा थरार कुस्ती शौकिनांनी लुटला. कुस्तीच्या आखाड्यात सांगली, सातारा, जालना, अहमदनगर, सिंधुदुर्ग,संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातून कुस्ती पैलवान व कुस्ती शौकीन आले होते. मैदानात झालेल्या सर्वच कुस्त्या लक्षवेधी ठरल्या. मैदानात एकूण सव्वा चार लाखाच्या कुस्त्या घेण्यात आल्या. प्रथम क्रमांकाच्या अटीतटीच्या लढतीत हरियाणाच्या रवी यादव यास कोल्हापूरच्या माऊली जमदाडे यांनी दुहेरी पट डावावर चितपट करत मानाच्या नागनाथ श्री केसरी व सव्वा लाखाच्या बक्षीसावर आपली मोहोर उमटवली.
नागनाथ यात्रेनिमित्त भरवण्यात आलेल्या कुस्त्यांची विराट दंगल कुस्ती शौकिनांच्या डोळ्याचे पारणे फेडणारी ठरली. नागनाथ यात्रा कमिटीने भरवण्यात आलेल्या कुस्त्यांच्या शुभारंभ शरद कारखान्याचे संचालक बबनराव भंडारी यांच्या हस्ते झाले. सर्वप्रथम लहान–लहान कुस्त्या लावण्यात आल्या त्यानंतर मोठ्या कुस्त्या लावण्यात आल्या. प्रथम तीन क्रमांकाच्या कुस्त्या माजी खासदार राजू शेट्टी, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील–यड्रावकर यांच्या हस्ते लावण्यात आल्या.
प्रथम क्रमांकाची कुस्ती कोल्हापूरचा माऊली जमदाडे यांनी हरियाणाच्या रवी यादवला दुहेरी पट डावावर चितपट करत जिंकली. दुसऱ्या क्रमांकाची 51 हजार रुपयेची कुस्ती प्रवीण सरक व सयाजी कोळेकर यांच्यात लावण्यात आली. ही कुस्ती बरोबरीत सोडवण्यात आली. तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती निलेश तरंगे व अनिल बारगजे यांच्यात लावण्यात आली. निलेश तरंगे यांनी अनिल बारगजे वर मात करत ४१ हजार रुपयांचे बक्षीस जिंकले. चौथ्या क्रमांकाची कुस्ती नाना ठोंबरे यांनी संभाजी भोसले यास चितपट करत ३१ हजार रुपये बक्षीस जिंकले २१ हजार रुपयाची कुस्ती अभिजीत कनीरे व नाथा चौगुले यांच्यात झाली ही कुस्ती बरोबरीत सोडवण्यात आले. १५ हजार बक्षिसाची कुस्ती उदय खांडेकर यांनी सुशांत जाधव यांच चितपट करत जिंकली याबरोबरच कुस्ती मैदानात 90 ते शंभर कुस्त्या लावण्यात आल्या.
याबरोबरच नरंदे येथील मल्ल वैभव अनुसे ,प्रदीप अनुसे ,सुनील अनुसे यांनी कुस्त्या जिंकत गावकऱ्यांचे मने जिंकली. कुस्ती समालोचक शंकर पुजारी यांच्या बोलण्याने व त्यांनी कुस्तीचे केलेले उत्कृष्ट समालोचन यामुळे कुस्ती मैदानात एक वेगळीच रंगत आली होती.
कुस्ती मैदानात माजी आमदार सुजित मिणचेकर, हातकणंगले नगरसेवक राजू इंगवले, जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभापतीचे प्रवीण यादव याच बरोबर अनेकांनी उपस्थिती लावली होती.
यावेळी मंत्री राजेंद्र पाटील–यड्रावकर यांच्या हस्ते सामाजिक कार्यात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल नरंदेचे सुपुत्र राजेंद्र पाटील यांना इचलकरंजीचा सामाजिक संस्थेचा पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर राजेंद्र पाटील–यड्रावकर यांचा सत्कार बबनरावजी भंडारी यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी नगरसेवक राजू इंगवले, डी.बी. पिष्टे, रावसाहेब चौगुले, प्रकाश भंडारी, कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष नामदेवराव मोहिते, सरपंच रवींद्र अनुसे,उपसरपंच अभिजित भंडारी, विनोद भंडारी, संतोष भंडारी, रघुनाथ गिड्डे, आनंदा खोत, भाऊसाहेब शेटे आदींसह यात्रा कमिटीचे सदस्य, यासह ग्रामस्थ कुस्तीशौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते. कुस्तीचे समालोचन शंकर पुजारी, मायकल चिपरीकर यांनी केले.