उइगूर मुस्लिमांना अमेरिकेचे पुन्हा समर्थन : चीनवर शरसंधान
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन
शिनजियांग प्रांतात उइगूर मुस्लिमांच्या विरोधात चीनच्या नरसंहारावर अमेरिका आवाज उठवत राहणार असल्याचे विदेशमंत्री एंटनी ब्लिंकन यांनी म्हटले आहे. अध्यक्ष जो बायडेन यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पुढील आठवडय़ात अमेरिका आणि चिनी अधिकाऱयांची पहिली बैठक होणार आहे.
ब्लिंकन आणि अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सुलिवान हे चीनच्या विदेश धोरण विभागाचे वरिष्ठ अधिकारी, चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचे विदेश विषयक प्रमुख यांग जेइची आणि विदेशमंत्री वांग यी यांच्यासोबत 18 मार्च रोजी अलास्काच्या ऐंकरेजमध्ये चर्चा करणार असल्याचे व्हाइट हाउसकडून सांगण्यात आले आहे. चीनच्या मानवाधिकारांच्या उल्लंघनावर अमेरिका आवाज उठवत राहणार आहे. आम्ही याला नरसंहार, मानवाधिकारांचे उल्लंघन म्हणूनच पाहतो असे उद्गार ब्लिंकन यांनी संसदेच्या विदेश विषयक समितीच्या सदस्यांना उद्देशून म्हटले आहे. बायडेन प्रशासन हा नरसंहार रोखण्यासाठी अतिरिक्त पावले उचलत आहे का असा प्रश्न खासदार मायकल मॅककॉल यांनी उपस्थित केला होता. आम्ही अनेक गोष्टी करू शकतो आणि करू देखील. सर्वात महत्त्वाचे यासंबंधी आवाज उठविणे आहे चीनविरोधात आम्ही नवे निर्बंध लादू शकतो असे ब्लिंकन यांनी उत्तरादाखल म्हटले आहे.