45 कोटींची आर्थिक फसवणूक : तपास बंद करण्याला ईडीचा विरोध, न्यायालयात आव्हान
प्रतिनिधी/ मुंबई
आर्थिक फसवणूक करून कोटय़वधी रुपयांचा गुन्हा दाखल करण्यात आलेल्या जेटचे संस्थापक व माजी अध्यक्ष नरेश गोयल यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. गोयल आणि त्यांच्या पत्नी विरोधातील चौकशी बंद करण्याच्या पोलिसांच्या निर्णयाला अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) विरोध केला असून सत्र न्यायालयात ईडीने मध्यस्थी अर्ज दाखल केला आहे.
जेट एअरवेजने 2018-19 मध्ये अकबर ट्रव्हल्स या कंपनीसोबत सुमारे 900 कोटींचा व्यवहार केला. त्यातील सुमारे 46 कोटी अकबर
ट्रव्हल्सला जेट एअरवेजकडून येणे बाकी होते. परंतु, हे पैसे बुडल्याने नरेश गोयलविरोधात एमआरए पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात तपास करण्यासारखे पुरावे नाहीत असे स्पष्ट करत पोलिसांनी गोयल यांच्यासह त्यांच्या पत्नीची चौकशी बंद करण्याचा निर्णय घेत असल्याबाबतचा अहवालही सत्र न्यायालयात सादर केला आहे. मात्र, पोलिसांच्या याच अहवालावर आक्षेप नोंदवत ईडीने सत्र न्यायालयात मध्यस्थी अर्ज दाखल केला आहे. सुमारे 46 कोटीच्या या घोटाळय़ात पोलिसांनी योग्य तपास केलेला नाही. म्हणूनच गोयल विरोधात पुरेसे पुरावे न्यायालयात सादर करण्यात पोलिसांना अपयश आल्याचा दावा ईडीच्यावतीने मध्यस्थी अर्जातून करण्यात आला आहे. दुसरीकडे अकबर ट्रव्हलकडूनही पोलिसांच्या अहवालाला विरोध दर्शविण्यात आला. याप्रकरणी 6 जुलै रोजी आव्हान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.