तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील परिचारिका बालन चौरे व आशा कसबे यांना कारण न सांगताच प्रभारी अधिष्ठाता डॉ. शुभलक्ष्मी जयस्वाल यांनी सक्तीची रजा दिली. परिणामी सिव्हिल हॉस्पिटलमधील जवळपास सर्व परिचारिकांनी कामावर हजर न होता गेटवर आंदोलनास सुरुवात केली. नर्सेसच्या आंदोलनामुळे प्र. अधिष्ठाता डॉ. शुभलक्ष्मी जयस्वाल यांना सक्तीच्या रजेचा अर्ज मागे घेण्याची नामुष्की ओढावल्याचा प्रकार सोमवारी घडला.
सिव्हिल हॉस्पिटलमधील बालन चौरे व आशा कसबे यांना या दोन परिचारिकांना कोणतेही कारण न देता एक महिन्याच्या सक्तीच्या रजेवर प्रभारी अधिष्ठाता डॉ. शुभलक्ष्मी जयस्वाल यांनी पाठवले होते. सदरची गोष्ट इतर परिचारिकांना समजताच सोमवारी सकाळी 8 वाजता सिव्हिल हॉस्पिटलच्या गेटवर जवळपास इतर सर्व परिचारिकांनी गर्दी करत कामावर हजर होणार नसल्याचे सांगत आंदोलनास सुरुवात केली. परिणामी या आंदोलनाची दखल घेत प्रभारी अधिष्ठाता डॉ. शुभलक्ष्मी जयस्वाल यांनी सक्तीची रजा रद्द करण्याचे तोंडी आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
प्रशासनाचा निषेध
सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रविवारी रात्री आपली ड्युटी संपवून घरी गेलेल्या दोन परिचारिकेला एका तासामध्ये रुग्णालय प्रशासनाकडून मेसेज आला. यात संचालक स्तरावरून आदेश आला असून आपणाला एक महिन्याच्या सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. पुढील आदेश येईपर्यंत आपण कामावर रुजू होऊ नये, असे सांगण्यात आले. आत्ताच ड्युटी करुन आल्यानंतर मेसेज आल्याने दोन्ही परिचारिका गोंधळल्या. सोमवारी सकाळी याबद्दल ही बाब इतर परिचारिकांसह इतर कर्मचाऱ्यांना समजली. परिणामी सिव्हिल हॉस्पिटल समोर सुमारे 200 परिचारिका व कर्मचारी यांनी आंदोलन करून प्रशासनाचा निषेध केला.