लस टोचण्याच्या बहाण्याने कोरोना प्रसाराच्या कारस्थानाचा आरोप
अलिगढ / वृत्तसंस्था
उत्तर प्रदेशच्या अलिगढ जिल्हय़ातील एका कोरोना केंद्रात लस टोचण्याचा बहाणा करणाऱया आणि प्रत्यक्षात लसींनी भरलेल्या बाटल्या कचरा पेटीत फेकून देणाऱया निहा खान या नर्सला अटक होण्याची शक्यता आहे. तिचा हा प्रकार उघड झाल्यानंतर तिला नोकरीतून निलंबित करण्यात आले होते. आता तिची चौकशी सुरू असून अहवालानंतर तिला अटक होण्याची शक्यता आहे.
हे प्रकरण रविवारी बाहेर आले होते. निहा खान ही नर्स लोकांना लस टोचण्याऐवजी केवळ त्यांच्या दंडात सुयी टोचत होती आणि लसीची भरलेली बाटली कचरा पेटीत फेकून देत होती. हा प्रकार एका लस टोचून घेणाऱयाच्या लक्षात आल्यानंतर त्याने तो वरीष्ठ अधिकाऱयांना सांगितला होता. या प्रकाराचे व्हिडीओ चित्रणही प्रसारित झाले आहे. नंतर या केंद्रावर धाड घालण्यात आली असता लसीने भरलेल्या 29 बाटल्या कचरापेटीत सापडल्या होत्या. या प्रकाराची माहिती असणारा पण ती लपविणारा अधिकारी आफ्रिन याचीही बदली करण्यात आली असून त्याच्यावर कठोर कारवाई होणार आहे.
व्हॅक्सिन जिहादचा आरोप
ही नर्स हा प्रकार हेतुपुरस्सर कोरोनाचा प्रसार व्हावा, तसेच लसीबद्दल जनतेच्या मनात शंका निर्माण व्हावी, यासाठी करीत होती असा आरोप आता होत आहे. हा ‘व्हॅक्सिन जिहाद’चा प्रकार असल्याची टिप्पणी मोठय़ा प्रमाणात सोशल मिडियावरून होत आहे. या प्रकारामुळे अनेकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या असून असे प्रकार करणाऱयांना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी होत आहे. लस टोचण्याचा तिचा बहाणा हा व्यापक कारस्थानाचा भाग आहे काय, याची चौकशी करण्यात यावी, अशीही मागणी लोकांकडून होत आहे.
लक्ष देणे आवश्यक
लस टोचून घेताना ती टोचून घेणाऱया व्यक्तीचेही या सर्व प्रक्रियेकडे लक्ष आण आवश्यक आहे, हे या प्रकारावरून लक्षात येते, असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. लस टोचत असताना कित्येकदा टोचून घेणाऱया व्यक्तीचा चेहरा विरुद्ध बाजूला वळविलेला असतो. तसे न करता लस इंजेक्शनमध्ये बाटलीतून ओढून घेतली जाते की नाही आणि ती प्रत्यक्षात शरीरात टोचली जाते की नाही, याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे, असेही तज्ञांनी सुचविले आहे.