प्रतिनिधी/ सातारा
शाहुपूरी कण्हेर पाणीपुरवठा उपाययोजनेमधुन शाहुपूरीकरीता4500 कनेक्शन्स मंजूर करण्यात आली असली तरी सुमारे 12 कोटी वाढीव निधी मंजूर करवून घेतला असल्यामुळे, त्यापेक्षा जास्त कनेक्शनची गरज भासल्यास, सर्वांना कनेक्शन्स देण्याची कार्यवाही एमजेपीकडून केली जावी, कनेक्शनकरीता कोणाची अडवणुक होता कामा नये, काही समस्या असल्यास आमच्याशी संपर्क साधावा त्यातुन योग्य तो मार्ग काढला जाईल, अश्या स्पष्ट सूचना खासदार उदयनराजे भोसले यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता श्री.भुजबळ यांचेसह स्थानिक अधिका-यांना दिल्या.
मुख्य अभियंता श्री.भुजबळ यांना आज खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी बोलावून घेवून, शाहुपूरी कण्हेर पाणीपुरवठा योजनेचा आढावा घेताना या सूचना दिल्या. यावेळी शाहुपूरी गटाचे माजी सदस्य संजय पाटील, काका धुमाळ, खासदार उदयनराजे भोसले यांचे खाजगी सचिव जितेंद्र खानविलकर, एमजेपीच्या सातारा कार्यालयाच्या उपकार्यकारी अभियंता कु.चौगुले,आणि अधिकारी वर्ग उपस्थित होता.
एाहुपूरीचा भाग आता नगरपरिषदेच्या हददीत समाविष्ट झाला आहे. त्यामुळे सदरबझार मध्ये ज्याप्रमाणे एमजेपीचा पाणीपुरवठा होतो आणि बीले देखिल एमजेपीकडे भरणा होतात, त्यानुसार शाहुपूरीची वाढीव पाणीयोजना ही योजना एमजेपीनेच चालवावी, त्याबाबतचे नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांचे लेखी पत्र देण्यात येईल, परंतु कोणत्याही कुटुंबाची पाण्याची समस्या उदभवून देवू नये याची काळजी एमजेपी आणि नगरपरिषदेने घ्यावी असे देखिल खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी स्पष्ट केले.
मुख्य अभियंता यांनी याबाबत लवकरच कार्यवाही करुन, नगरपरिषदेच्या सहकार्याने कोणाची अडचण केली जाणार नाही अशी ग्वाही यावेळी दिली.