प्रतिनिधी/ फोंडा
भरमसाठ रकमेच्या पाणी बिलांनी फोंडय़ातील ग्राहकांच्या डोळय़ात पाणी आणले आहे. चार लोक राहणाऱया एका कुटुंबाला तब्बल दीड लाख रुपये नळाचे बिल आल्याचा प्रकार फोंडय़ातील मगो नेते डॉ. केतन भाटीकर यांनी उघडकीस आणला आहे. नळाच्या भरमसाठ बिलांबाबत ही एकच तक्रार नसून बऱयाच ग्राहकांना 9 ते 12 हजारापर्यंत बिले आल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
मुख्यमंत्र्यांनी दोन महिन्यापूर्वी 16 युनिट म्हणजेच महिन्याकाठी 16 हजार लिटर पाणी मोफत देण्याची घोषणा केली होती. या मोफत पाण्याने एवढा घोळ घातलेला आहे की, बऱयाच ग्राहकांना हजारो रुपयांची बिले येऊ लागली आहेत. आमदार विकत घेण्यासाठी कोटय़वधींचा सौदा करणाऱया भाजपने हेच पैसे गरीब जनतेच्या कल्याणासाठी वापरले असते तर जनतेने दुवा दिले असते असेही डॉ. भाटीकर म्हणाले. फोंडय़ातील मुख्य रस्त्यांचे हॉटमिक्स डांबरीकरण सध्या सुरु आहे. मात्र शांतीनगर, कुरतरकरनगरी, सांताप्रूज, खडपाबांध, दुर्गाभाट, वारखंडे या भागातील अंतर्गत रस्ते कधी हॉटमिक्स होणार असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.