प्रतिनिधी/ सातारा
सातारा नगरपालिकेने नळ जोडणी तपासणी मोहीम हाती घेतली आहे. यासाठी विविध भागात पथके नेमली आहेत. ही पथके जोडण्यांची तपासणी करत त्यांच्या नोंदी घेत आहेत. यामुळे अधिकृत व अनधिकृत नळ जोडण्याची संख्या समोर येणार आहे.
कास, शहापूर, तसेच जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून सातारा शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. या पाण्याचा वापर योग्य रितीने व्हावा आणि पाणी पुरवठय़ात सातत्य रहावे यासाठी पाणीपुरवठा सभापती सीता हदगे, अधिकारी, कर्मचारी उपाययोजना राबवत आहेत. सातारा शहरातील अधिकृत आणि अनधिकृत नळ जोडण्यांचा गंभीर विषय समोर आल्यानंतर सर्वच नळ जोडण्याची तपासणी करत त्याच्या नोंदी घेण्याचा निर्णय पालिका बैठकीत घेण्यात आला. यानुसार 40 कर्मचारी नेमत त्यांच्या मदतीने हे काम सुरू करण्यात आले आहे. बोगदा परिसर, जानकर कॉलनी, तसेच डोंगर उतारावरील नागरी वसाहतीत घरोघरी जाऊन पालिकेच्या कर्मचाऱयांनी नळ जोडण्यांनी तपासणी करत त्यांच्या नोंदी घेतल्या.