डायबेटिस अर्थात मधुमेहाच्या व्याधीमध्ये रक्तशर्करेची पातळी एका मर्यादेच्या पलीकडे वाढत गेल्यास रुग्णांना इन्सुलीनचे इंजेक्शन वापरण्यावाचून पर्याय राहात नाही.
- हे इन्सुलिन थंड वातावरणात म्हणजेच फ्रीजमध्ये ठेवणे गरजेचे असते. परिणामी, अशा मधुमेहींना प्रवास करताना मोठे टेन्शन असते. पण या तणावातून आता मुक्तता होणार आहे. कारण लांबच्या प्रवासात इन्सुलिन सोबत घेण्याच्या या अडचणीवर मात करण्यासाठी शास्त्रज्ञांनी एक इन्सुलिन तयार केलं आहे, जे फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज भासणार नाही.
- कोलकाताच्या बोस इन्स्टिटय़ूट आणि इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल बायोलॉजी च्या दोन शास्त्रज्ञांसह हैदराबादच्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीच्या दोन शास्त्रज्ञांनी ही किमया साधली आहे.
- त्यांनी तयार केलेले नवे इन्सुलिन हे थर्मोस्टेबल म्हणजे खोलीच्या तापमानातही सुरक्षित राहणारे असेल.
- या संशोधनाचा उल्लेख आंतरराष्ट्रीय विज्ञान जर्नलमध्येही करण्यात आला आहे. बोस इन्स्टिटय़ूटचे प्राध्यापक सदस्य शुभ्रांगसू चॅटर्जी याविषयी सांगतात की, तुम्ही हे इन्सुलिन तुमच्या सोयीनुसार फ्रीजमधून बाहेर ठेवू शकता. सध्या आम्ही त्याचे नाव ’इन्सुलॉक’ ठेवलं आहे. आम्ही लवकरच विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाकडे आचार्य जगदीशचंद्र बोस यांच्या नावावर अपील करणार आहोत.
- असे इन्सुलिन जर किफायतशीर दरात बाजारात उपलब्ध झाले तर मधुमेहींसाठी ते वरदानच असेल यात शंका नाही !