ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी रविवारी नवज्योत सिंह सिद्धू यांना पंजाबचे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्त केले आहे. मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांचा आक्षेप असूनही पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी हा निर्णय घेतला आहे. दिल्लीमध्ये रविवारी दिवसभर नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर रात्री उशिराने सिद्धू यांची सुनील जाखड यांच्या जागी निवड करण्यात आली.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती करण्यात आली. सिद्धू यांच्यासह संगतसिंग, सुखविंदरसिंग, पवन गोएल, कुलजितसिंग यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.पंजाब काँग्रेसमध्ये अमरिंदर सिंह आणि सिद्धू यांचे सरळसरळ दोन गट पडल्याची रविवारी दिवसभर चर्चा होती.
दरम्यान, पंजाबमध्ये 2017 च्या विधानसभा निवडणुकीवेळी भाजपमधून काँग्रेसमध्ये दाखल झाले तेव्हापासून विविध आमदार, खासदारांचा पाठिंबा मिळविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. अमरिंदर यांच्या विरोधानंतरही सिद्धू यांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्षपदाची माळ पडल्याने काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची मर्जी त्यांनी संपादित केल्याचे दिसत आहे.
प्रदेशाध्यक्षपदावरून मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांच्याबरोबर सिद्धू यांचे वाद आहेत. सोनिया गांधी यांनी घेतलेला कुठलाही निर्णय सर्वांना स्वीकारार्ह असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.