यंदाच्या स्वातंत्र्य दिनासाठी केंद्राकडून मार्गदर्शक सूचना जारी : केंद्रीय गृह मंत्रालयाकडून राज्यांना दिशानिर्देश
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोना संसर्ग दिवसेंदिवस उग्र स्वरुप धारण करत असल्याने पुढील महिन्यात होणाऱया स्वातंत्र्य दिनासंबंधी केंद्रीय गृह मंत्रालयाकडून नव्या मार्गदर्शन सूचना जारी करण्यात आल्या आहेत. 15 ऑगस्टच्या कार्यक्रमासंदर्भात सरकारी कार्यालये, राज्य सरकार आणि राज्यपाल यांना नवी नियमावली पाठविण्यात आली आहे. या नियमावलीनुसार नवतंत्रज्ञानाचा आधार घेत ध्वजवंदन सोहळा साजरा करण्याचे निर्देश राज्यांना देण्यात आले आहेत.
कोरोना संक्रमणादरम्यान यावषी स्वातंत्र्यदिन कसा साजरा करावा असा प्रश्न उपस्थित केला जात होता. यासंबंधी केलेल्या विचारमंथनानंतर गृह मंत्रालयाने शुक्रवारी दिशानिर्देश जारी केले. 15 ऑगस्ट रोजी पंतप्रधान मोदी राजधानीमध्ये तिरंगा फडकावतील. त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात येईल. त्यानंतर ते भाषणही देणार असल्याचे सांगण्यात आले. तथापि, यावेळी सोशल डिस्टन्सिंग पाळण्यात येणार आहे. या कार्यक्रमाप्रमाणेच देशात अन्यत्रही गर्दी टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कोरोनामुळे यंदा स्वातंत्र्याचा सण साजरा करण्यासाठी नवतंत्रज्ञानाचा वापर करण्यात यावा, असा सल्ला देण्यात आला आहे. सरकारने केलेल्या सूचनांची अंमलबजावणी जिल्हा, तालुका व ग्रामपंचायत स्तरावरही करावी लागणार आहे.
देशावर ओढावलेल्या कोरोनाच्या दुष्ट संकटाचा कहर हा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच देशातील कोरोना बाधितांचा आकडा 13 लाखांच्या उंबरठय़ावर येऊन पोहोचला आहे. त्याच पार्श्वभूमीवर कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाच्या निमित्ताने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे.